सद्गुरू : मानवतेचे तीन स्तर आहेत. काही लोक स्वतःची काळजी देखील घेत नाहीत; इतरांनी त्यांची काळजी घ्यावी अशी ते अपेक्षा करतात. कृमी आणि कीटकदेखील स्वतःची काळजी घेतात; परंतु हे लोक दुर्दैवाने स्वतःला त्याच्याही खाली ठेवतात. पुढचा स्तर आहे अशा लोकांचा, जे स्वतःची काळजी घेतात.
हे लोक कृमी आणि कीटकांसारखे आहेत, ते स्वतःचे काम करत राहतात. ते स्वतःचे काहीतरी करत असतात - त्यांना इतर कोणाची पर्वा नसते आणि ते कोणालाही त्रास देत नाहीत. तुम्हाला असे वाटत असेल, की अशा प्रकारे राहणे तुमच्यासाठी ठीक आहे, तर तुम्ही तसे राहू शकता; पण तुम्ही मानवी क्षमतेचा शोध घेणार नाही, कारण हा असा स्वभाव प्राण्यांचा आहे.
कृपया पाहा, कोणताही प्राणी जाणूनबुजून कोणालाही त्रास देत नाही. ते तुमच्याकडे फक्त खाद्य म्हणून पाहू शकतात आणि तुम्हाला खाऊन टाकू शकतात, परंतु तो त्रास नाही. त्याच्यासाठी ते चांगले आहे!
पण तुमची मानवता ओसंडून वाहत असेल, तर तुम्ही ज्या ज्या जीवनापर्यंत पोहोचू शकता त्या प्रत्येक जीवनापर्यंत पोहोचणे हे तुमच्यासाठी अगदी स्वाभाविक आहे. हे एखादे नैतिक तत्त्व नाही, की - ‘मी सर्वांना मदत करणार आहे.’ हा मानवी स्वभाव आहे; हे मानवी हृदयाचे स्वरूप आहे. एखाद्या माणसासाठी हे अगदी स्वाभाविक आहे, की जर त्याच्या हृदयात आसपासच्या कोणत्याही गोष्टीबद्दल काही असेल, तर गरज असेल तेव्हा तो मदतीला धावून जाईल.
लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडे कोणतीही नैतिकता किंवा तत्त्वज्ञान असणे गरजेचे नाही. तुम्ही एखाद्या तत्त्वज्ञानामुळे किंवा कोणाकडून शिकलेल्या नैतिक नियमांमुळे मदत करत असाल, तर तुम्ही एक अतिशय गरीब मनुष्य आहात.
जर तुम्ही काही महान माणसांना त्यांच्या आसपासच्या प्रत्येकाला मदत करताना पाहिले असेल, आणि एखाद्या तत्त्वामुळे त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असाल - तर हा मानव असण्याचा हा एक अतिशय गरीब मार्ग आहे.
पण तुम्ही तुमची मानवता पूर्णपणे जागृत आणि सक्रिय ठेवली, तर हे तुमच्यासाठी अगदी स्वाभाविक आहे, की जिथे काहीही गरज असेल, तिथे तुम्ही पोहोचाल आणि जे करू शकता ते कराल. म्हणून तुमच्या जीवनात, एक मानव म्हणून, तुम्ही जर, जे करू शकत नाही ते केले नाही, तर त्यात काही समस्या नाही. पण जर, तुम्ही जे करू शकता, ते केले नाही, तर तुम्ही मानव म्हणून अयोग्य आहात.