जपानमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये 900 हून अधिक वेळा भूकंप आला आहे. या पूर्व आशिया देशात सध्या खळबळ उडाली आहे. त्यातच जपानमध्ये महाप्रलय, त्सुनामी होईल अशी भीती काही भविष्यवेत्त्यांच्या भविष्यवाणींमुळे पसरली आहे. अनेक पर्यटकांनी जपानचे विमान तिकीट रद्द केले आहे. अनेकांनी हॉटेल्सचे बुकिंग रद्द केले आहे. त्यात या भूकंपाने भीतीची भर घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील नागरिकांच्या डोळ्याला डोळा नाही. ते जागरण करत आहेत.
बुधवारी 5.5 तीव्रतेचा भूकंप
बुधवारी जपानमध्ये 5.5 तीव्रतेचा भूकंप आला. 21 जूनपासून टोकारा द्वीप समूहाजवळ 900 भूकंप आले. अजून त्सुनामीचा कोणताच इशारा अद्याप प्रशासनाने आणि हवामान खात्याने दिला नाही हाच एक मोठा दिलासा आहे. या भूकंपात अद्याप जीवितहानीची वार्ता आली नाही. तसेच फारसे नुकसान पण झालेले नाही.
जर भूकंपाचे धक्के वाढले अथवा तीव्र भूकंप येण्याची अंदाज आल्यास हे द्वीप तातडीने सोडण्यासाठी तयार राहण्याचा इशारा प्रशासनाने स्थानिकांना दिला आहे. जपान हा प्रशांत महासागरातील देश आहे. या क्षेत्राला भूकंप प्रभावित म्हणून ओळखल्या जाते. हा प्रशांत समुद्रातील रिंग ऑफ फायरवर वसलेला देश म्हणून ओळखल्या जातो. टोकारा द्वीप समूहावरील लोक सध्या भयभीत आहे. केव्हा काय आपत्ती, नैसर्गिक संकट येऊन कोसळेल हे त्यांनाही माहिती नाही.
दरवर्षी 1500 भूकंप
जपानच्या टोकारा क्षेत्रात दरवर्षी भूकंप येतात. यावेळी 14 दिवसात 900 भूकंप आल्याने सर्वच जण चिंतेत आहेत. कारण वर्षभरात येथे 1500 भूकंप येतात. यावेळी अवघ्या 14 दिवसातच भूकंपाने कहर केला आहे. टोकारावरील 12 द्वीपांपैकी 7 ठिकाणी 700 लोक राहतात. या भागात दूरपर्यंत दवाखाने वा इतर कोणत्याच सोयी-सुविधा नाहीत. या भूकंपामुळे येथे रात्री समुद्राच्या पोटातून भीतीदायक आवाज येत असल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले.
त्या भविष्यवाणीने उडाली झोप
रिओ तात्सुकी हिने अचूक भविष्यवाण्या केल्या आहेत. तिने 2011 मधील तोहोकू भूंकप आणि काही इतर प्रमुख घटनांची नोंद तिच्या पुस्तकात केली होती. 1999 मध्ये हे पुस्तक बाजारात आले, तेव्हा तिच्या दाव्याकडे अनेकांनी फँटसी म्हणून पाहिले होते. पण जेव्हा या घटना घडल्या. त्यावेळी तिची मुलाखत घेण्यासाठी एकच गर्दी झाली. आता तिच्या याच पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीत 5 जुलैनंतर जपानमध्ये त्सुनामी येण्याचे भाकीत वर्तवल्याचा दावा आहे. त्यामुळे गदारोळ उडाला आहे.