विद्यार्थी लावणार आईच्या नावे झाड
शाळांमध्ये उपक्रम; ६५ हजार वृक्षांचे उद्दीष्ट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः शालेय स्तरावर पर्यावरण संवर्धानाच्यादृष्टीने ‘एक पेड माँ के नाम २.०’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड शाळेच्या परिसरात किंवा गावात लावायचे आहे. जिल्हा परिषदेच्या २ हजार ४०० शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेचे ६५ हजार विद्यार्थी हे झाड लावणार आहेत.
२०२४ मध्ये जागतिक पर्यावरणदिनापासून एक पेड माँ के नाम ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. आईच्या नावाने एक झाड प्रत्येकाने लावणे, असा या योजनेचा उद्देश असून पीएम मोदी यांनी या अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून सप्टेंबर २०२४ पर्यंत देशभरात ८० कोटी रोपे लावण्यात आली. त्यानंतर २०२५ पर्यंत १४० कोटी रोपे लावण्याचा निर्धार आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने असोला भाटी वन्यजीव अभयारण्यात २० जूनला वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू केला ज्यामध्ये अनेक नागरिकांनी त्यांच्या आईच्या सन्मानार्थ वृक्षारोपण केले. ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्याचे काम विद्यार्थी करत आहेत. या अभियानासाठी शासनाने स्वतंत्र अशी वेबसाइट तयार केली असून, या वेबसाइटवर झाड लावताना मुलाचा फोटो टाकला तर सहभागाचे प्रमाणपत्र मिळते.