Koyna Power House : कोयनेचे पायथा वीजगृह झाले ४४ वर्षांचं; साडेसहा लाख मेगावॉट वीजनिर्मिती; देखभाल, दुरुस्तीची गरज
esakal July 03, 2025 11:45 PM

-उमेश बांबरे

सातारा : कोयना पायथा उजवा तीर वीजगृहातून ४० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. दोन जनित्रांच्या माध्यमातून ही वीजनिर्मिती होत आहे. आजपर्यंत या वीजगृहातून साडेसहा लाख मेगावॉट वीजनिर्मिती केली आहे. विद्युतगृहाला ४४ वर्षे झाली असून, त्याचे आयुष्यमान संपत आले आहे. आता वीजगृह जुने झाल्याने याची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने डाव्या तीरावर नवे वीजगृह बांधण्याचा निर्णय घेतला असून, या कामाला मान्यता दिली आहे.

Solapur News : डॉ. वळसंगकरांचा ‘सीडीआर’ न्यायालयात सादर; जीवन संपवण्याआधी काही मिनिटांपूर्वी रुग्णालयातून फोन

कोयना जलविद्युत प्रकल्प हा देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. धरणाच्या कामानंतर पायथ्याशी उजव्या तीरावर १९७५ मध्ये वीजगृह बांधण्यात आले. पावसाचे अतिरिक्त वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर होण्यासाठी हे वीजगृह उभारण्यात आले. प्रत्यक्ष हे वीजगृह १९८१ मध्ये कार्यान्वित करण्यात आले. धरणाच्या पायथ्याशी प्रत्येकी २० मेगावॉट क्षमतेची दोन जनित्रे बसविण्यात आली होती. या वीज केंद्रातून वार्षिक १८४ दशलक्ष युनिट ऊर्जा संकल्पित केली होती. जनित्र संच एक व दोन अनुक्रमे, फेब्रुवारी १९८१ व मार्च १९८१ मध्ये कार्यान्वित केली आहेत. त्यानंतर हे वीज केंद्र त्यावेळचे राज्य विद्युत मंडळ व आताचे विद्युत निर्मिती कंपनीकडे चालविण्यास व देखभालीसाठी सोपविण्यात आले होते. त्यावेळेसपासून २०२१ पर्यंत या केंद्राची सर्व देखभाल दुरुस्ती राज्य विद्युत मंडळ करत होते.

त्यानंतर विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार प्रकल्पाच्या भाडेपट्टा यापूर्वीच वसूल झाल्याने भाडेपट्टी बंद करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही. २०२५ मध्ये या प्रकल्पाला ४४ वर्षे पूर्ण झाली आहे. आता या पायथा वीजगृहाचे आयुष्यमान संपलेले असून, त्याची दुरुस्ती व देखभाल होणे गरजेचे आहे. त्यासाठी खर्च करण्यापेक्षा त्यावेळी धरणाच्या पायथ्याजवळ डाव्या तीरावर दुसरे वीजगृह उभारण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता. पूर्वी सिंचनासाठी पाणी सोडताना धरणाच्या पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करूनच पाणी सोडले जात होते. त्यासाठी या उजव्या तीरावरील वीजगृहाचा वापर केला जात होता. त्यावेळी ८० मेगावॉट त्याची क्षमता होती. या वीजगृहाने गेल्या ४४ वर्षांत तब्बल सहा लाख ४२ हजार ४०० मेगावॉट विजेची निर्मिती केली आहे. कोयनेतून वाहून जाणाऱ्या पाण्याचा त्यासाठी वापर झाला आहे.

राज्याच्या वाट्याला आलेल्या पाण्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी विविध सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले होते. त्यानुसार कृष्णा नदीवर विविध उपसा सिंचन योजनांचाही समावेश केला. या सर्व प्रकल्पासाठी कोयना धरणातून सिंचनासाठी ५० अब्ज घनफूट इतके पाणी उपलब्धता लक्षात घेऊन या योजनांचे नियोजन केले. या वाढीव पाणी मागणीमुळे सिंचनासाठी सोडावा लागणाऱ्या विसर्ग ९७.४३ घनमीटर प्रतिसेकंद इतका होता. हा वाढीव विसर्ग धरणाच्या पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून सोडता येणे शक्यता नव्हते.

कारण उजव्या तीरावरील हे वीज केंद्र ४४ वर्षे जुने झाल्यामुळे वाढीव विसर्गातून विद्युत निर्मिती होण्यासाठी धरणाच्या पायथ्याशी डाव्या तीरावर ८० मेगावॉट क्षमतेचे विद्युतगृह उभारण्याचा निर्णय झाला. त्यासाठी २४५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला त्यावेळी शासनाने मान्यता दिली होती. मात्र, डाव्या तीरावरील हा प्रकल्प आठ ते दहा वर्षे झाले रखडला होता. आता २०२५ मध्ये नुकतीच डाव्या तीरावरील विद्युत केंद्रासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता महायुती सरकारने दिली आहे. त्यामुळे डाव्या तीरावर हे नवे वीजगृह होणार आहे. उजव्या तीरावरील प्रकल्पावरील भार कमी होणार आहे.

सातारा तालुका हादरला! 'मैत्रीण दुसऱ्याबरोबर दिसल्याने मुलाने जीवन संपवले'; तिने मला धोका दिला मी जगणार नाही अन.. प्रकल्पाच्या कामाला मंजुरी

आजपर्यंत उजव्या तीरावरील विद्युत केंद्राची देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही. २०२५ मध्ये या प्रकल्पाला ४४ वर्षे पूर्ण झाली असून, आता या पायथा वीजगृहाचे आयुष्यमान संपलेले आहे. त्याची दुरुस्ती व देखभाल होणे गरजेचे आहे. त्यासाठी खर्च करण्यापेक्षा त्यावेळी धरणाच्या पायथ्याजवळ डाव्या तीरावर दुसरे वीजगृह उभारण्याचा निर्णय मागेच झाला होता; पण निधीअभावी हा प्रकल्प रखडला होता. आता महायुती सरकारने पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन डाव्या तीरावरील प्रकल्पाच्या कामाला मंजुरी दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.