अमरावती शहरातील इर्विन चौक ते राजकमल चौकाच्या दरम्यान असलेल्या उड्डाण पुलावर सोमवारी सकाळी एक दुर्दैवी अपघात झाला. पेट्रोलने भरलेला टँकर एका दुचाकीस्वार महिलेला जोरदार धडक देत गेला. या अपघातात दुचाकीस्वार महिला वर्षा खाळंगे यांचा जागीच मृत्यू झाला.
वर्षा खाळंगे या अमरावतीतील अर्जुन नगर भागातील रहिवासी होत्या. अपघातानंतर त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले.
अपघातानंतर पोलिसांनी संबंधित टँकर ताब्यात घेतला असून, सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Dombivli Live : ठाकरेंच्या सभेपुर्वी डोंबिवलीत मराठी अस्मितेचे बॅनरझ!ठाकरेंच्या विजयी सभेला काही तास उरले असताना, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण परिसरात राजकीय रंग चढलेले बॅनर्स झळकले.
या बॅनर्सवर असे मजकूर दिसले:
"महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं आहे... हीच सुरुवात!"
"आपल्याला जाहिर आमंत्रण – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे"
"मी अत्यंत कडवट मराठी आहे आणि माझ्यावरचे संस्कारही तसेच आहेत." – राज ठाकरे
हे बॅनर्स आगामी राजकीय घडामोडींना दिशा देणारे असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
Wainganga Live Updates: जोरदार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारागोंदिया जिल्ह्यात मागील 5 दिवसात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे वैनगंगा नदीवर बनविण्यात आलेल्या धापेवाडा बॅरेजचे 7 दरवाजे उघडले असुन 45,825 क्युसेकने सध्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जोरदार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे बॅरेज मधून पाणी सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Raj Thackeray Live Updates: राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या विरोधात मनसे आक्रमकराज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या विरोधात मनसे आक्रमक
पुण्यातील वनाज भागात केदार सोमण राहत आहे
मनसेच्या कार्यकर्ते चोप देत करणार पोलिसांच्या हवाले
मनसे कार्यकर्ते आक्रमक
राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्याच्या विरोधात मनसे आक्रमक
कार्यकर्त्यांना पकडून मनसैनिकांनी केली मारहाण
पुणे येथील विशेष न्यायालयात स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी खटल्याची आज सुनावणी.
लोकसभेतील विरोधीपक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी लंडन मधील एका कार्यक्रमात भाषण करताना सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले होते.
त्या प्रकरणी राहूल गांधी यांच्यावर बदनामीचा खटला पुणे येथील विशेष न्यायालयात दाखल आहे. त्याची आज सुनावणी होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने भंगसाळ नदीचे पाणी कुडाळ शहरात घुसले असून, त्यामुळे शहरात जाण्याचा मार्ग बंद आहे. तर नजीकच्या पावशी, वेताळ बांबर्डे येथे सुद्धा पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Nashik Live : सुनील बागल आणि मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश थांबलानाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे सुनील बागल आणि मामा राजवाडे यांचा आज भाजप प्रवेश होणार होता पण त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याने भाजपवर टीका होऊ लागली. यामुळे त्यांचा भाजपप्रवेश थांबल्याची सूत्रांची माहिती आहे.
Devendra Fadnavis live: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला खास पोशाखआषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या प्रतिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खास भरजरी पोशाख अर्पण करण्यात आला. यंदा हा पोशाख जांभळ्या आणि भगव्या रंगातील असून त्यावर नाजूक कारागिरी आणि झळाळीदार काठ आहे. ही दिव्य वस्त्रं श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर सजवण्यात आली
Nashik Live News: नाशिकमध्ये ठाकरे गटाची मुस्कटदाबी; फक्त ४ नगरसेवक उरले२०१७ मध्ये नाशिक महापालिकेत शिवसेनेचे तब्बल ३५ नगरसेवक निवडून आले होते. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे उलटली आहे. ठाकरे गटाकडे सध्या केवळ बोटावर मोजण्याइतके – म्हणजेच फक्त ४ नगरसेवक उरले आहेत. उर्वरित ३१ नगरसेवकांनी भाजप आणि शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, फरार असलेले सुनील बागुल आणि मामा राजवाडे लवकरच थेट भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा राजकीय झटका बसल्याचे स्पष्ट होते.
Rain Update Live: विदर्भात पावसाची तूट: नागपूरमध्ये सर्वाधिक ४४ टक्के कमतरतायंदा जून महिन्यात संपूर्ण विदर्भात पावसाची सरासरीपेक्षा १२ टक्क्यांची तूट नोंदवण्यात आली असून, विशेषतः नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ४४ टक्के पावसाची कमतरता जाणवली आहे. विदर्भातील केवळ बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये सरासरीइतका पाऊस झाल्याने बुलढाणा जिल्हा ३३ टक्के प्लसमध्ये आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र सरासरी गाठता न आल्याने पावसाची तूट स्पष्टपणे जाणवते. नागपूरनंतर पूर्व विदर्भातील अमरावती, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांमध्येही लक्षणीय तूट पाहायला मिळत आहे. मात्र हवामान विभागानुसार, जुलै महिन्यात या तुटीची भरपाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Badlapur News Live : डिप्रेशनमुळे वृद्धाची नाल्यात उडी मारून आत्महत्याबदलापूरमध्ये एका वृद्धाने डिप्रेशनमुळे वाहत्या नाल्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अजय राजा हॉलजवळील पुलावरून त्यांनी सकाळी आठच्या सुमारास नाल्यात उडी मारली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला. पत्नीच्या निधनानंतर ते नैराश्यात गेले होते, आणि त्यामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. स्थानिकांमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Nashik News Live : नाशिकमध्ये ठाकरेंना धक्का, २ दिग्गजांसह १० जण भाजपच्या गळालाउद्धव ठाकरे यांना नाशिकमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनी पक्षाला रामराम ठोकला असून ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी हा ठाकरे गटाला मोठा धक्का समजला जात आहे.
Pune News Live Updates : पवना धरणक्षेत्रात मुसळधार, २४ तासात ९४ मिमी पावसाची नोंदमावळ आणि पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरण परिसरात काल जोरदार पाऊस झाला त्यामुळे 24 तासात धरण क्षेत्रात 94 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज पर्यंत पवना धरण क्षेत्रात मध्ये 1022 पाऊस झाला आहे
Sanjay Raut : अटकेच्या भीतीने फरार झालेले भाजपात जातायत : राऊतभारतीय जमवा जमव पार्टी ची कमाल आहे. नाशिकमध्ये शिवसेना पदाधीकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले. त्यानंतर क्लायमॅक्स असा की, हे सगळे फरार ( भाजपा साठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत! जमवा जमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे, सत्ता पैसा दहशत! दुसरे काही नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशावर टीका केलीय.
Randeep Singh Surjewala News : पाकिस्तानला सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदावरून सुरजेवालांची नाराजीबंगळूर : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानने स्वीकारल्याबद्दल काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा एक गंभीर मुद्दा आहे. पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पाठिंबा देणारा देश आहे. अशा देशाला अध्यक्षपद मिळणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Kolhapur Politics News : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत किमान १५ जागा निवडून आणू - जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेकोल्हापूर : आगामी निवडणुकांसाठी पक्ष बळकट करून महत्त्व वाढवण्याचे काम केले जाणार आहे. पक्षप्रमुखांना पुन्हा एकदा जिल्ह्यात ताकद वाढवून दाखवू. महापालिकेच्या निवडणुकीत किमान १५ जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ट असून, आघाडीतील मित्र पक्षांची ताकद लागली तर काहीच अडचण येणार नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Sangli Crime News : मुले गटारातला चेंडू काढायला गेली अन् मृत अर्भक आढळलेसांगली : दुधगाव (ता. मिरज) येथे मुले क्रिकेट खेळत होती. खेळता-खेळता त्यांचा चेंडू गटारात पडला. तो काढण्यासाठी काही मुलं तिथे गेली. त्यांनी काठीने चेंडू बाहेर काढताना पिशवीतून मृत अर्भक बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली. काल सायंकाळी साडेसात वाजता हे उघडकीस आले. पोलिसपाटील दिलीप कुंभार यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
Apoorva Hire Marathi News : माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरेंचा भाजप प्रवेशराज्याच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय उलथापालथी सुरू असून, अनेक बडे नेते भाजपच्या वाटेवर असताना नाशिक जिल्ह्यातील माजी आमदार अपूर्व हिरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक, इंदापूरचे प्रवीण माने यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह बुधवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
Shirala Nagpanchami News : शिराळ्यातील नागपंचमीबाबत दिल्लीत बैठक, वनमंत्री गणेश नाईक यांची माहितीबत्तीस शिराळा (जि.सांगली) येथील नागपंचमी या सणामध्ये जिवंत नागांची पूजा करण्यास बंदी घातली आहे. ही बंदी उठवण्यासाठी केंद्रीय वन मंत्र्यांसोबत पुढील आठवड्यात सात किंवा आठ जूनला बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
Ichalkaranji Marathi News : इचलकरंजीत आढळला 'जीबीएस'सदृश रुग्णइचलकरंजी : शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) सदृश लक्षणे असलेला एक संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या ३० वर्षीय तरुणावर सध्या सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. युवकास काही दिवसांपासून हात-पाय कमकुवत होणे, थकवा आणि चालताना अडचण येणे अशी लक्षणे दिसत होती.
Shiv Sena Marathi News : शिवसेनेच्या 'धनुष्यबाणा'बाबत १६ जुलैला सुनावणी होण्याची शक्यतानवी दिल्ली : शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हासंदर्भात नियमित खंडपीठासमोर सुनावणी १४ किंवा १६ जुलैला होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या सुटीमुळे सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सध्या बंद आहे. १४ जुलैपासून नियमित कामकाज सुरु होणार आहे. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार १६ जुलैला याचिकेवर सुनावणी आहे.
PM Modi Marathi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर रवानाLatest Marathi Live Updates 3 July 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (ता. २) विदेश दौऱ्यावर रवाना झाले. घाना, त्रिनिनाद, टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या देशांना पंतप्रधान २ ते ९ जुलै या कालावधीत भेट देतील. तसेच वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीतील बारा टक्क्यांचा टप्पा (स्लॅब) हटविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदावरील नियुक्तीवरून नाराज असलेले उपनेते संजय पवार यांनी मुंबईत पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतरही पवार यांची नाराजी कायम आहे. शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हासंदर्भात नियमित खंडपीठासमोर सुनावणी १४ किंवा १६ जुलैला होण्याची शक्यता आहे. कोरोना महासाथीच्या काळात देण्यात आलेली प्रतिबंधक लस आणि अचानक होणारे मृत्यू यांचा परस्पर संबंध नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहे. ‘माझा मृत्यू झाल्यानंतर उत्तराधिकाऱ्याची निवड केली जाईल,’ असे तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांनी बुधवारी जाहीर केले. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..