नागपूर - शहरातील सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेल पॅराडाईजमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल देहविक्रीच्या पर्दाफाश करण्यात आला. गुन्हेशाखेच्या पथकाने उजबेकिस्तान येथील महिलेला ताब्यात घेतले. याप्रकरणी हॉटेलच्या चालक मालक असलेल्या महिलेला अटक केली आहे.
रश्मी आनंद खत्री (वय-४९, रा. गोविंदगड, उप्पलवाडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मी खत्री या काही वर्षांपूर्वी हॉटेल पॅराडाईज येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान काही महिन्यांपूर्वी त्यांनी हॉटेल पॅराडाईज मुळ मालकाकडून भाड्याने चालविण्यासाठी घेतले.
यादरम्यान त्यांनी दिल्लीतील कृष्णकुमार उर्फ राधे देशराज यांचेशी संपर्क साधला. त्यानुसार, हॉटेलमध्ये देहव्यापारास सुरुवात केली. त्यातून ग्राहकांच्या मागणीनुसार, त्यांना विदेशी महिलांच्या आणि मुलींच्या माध्यमातून देहव्यापार करण्यास सुरुवात करण्यात आली.
ही माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजाजन गुल्हाणे यांना मिळाली. त्यांनी आपल्या पंटरच्या माध्यमातून सापळा रचला. बुधवारी (ता.२) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पथकाने छापा टाकून विदेशी महिलेची सुटका केली.
यावेळी महिला उजेबेकिस्तान येथील असून ती दिल्लीतून मंगळवारी नागपुरात दाखल झाली होती. यावेळी पथकाने तिची सुटका करून चालक मालक असलेल्या महिलेला ताब्यात घेतले. याशिवाय दिल्लीतील कृष्णकुमार याच्याविरोधात तहसील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत महिलेला त्यांच्या स्वाधीन केले.
व्हॉट्सॲपवरून करायच्या मागणी
गुन्हेशाखेच्या पथकाकडून पॅराडाईज हॉटेलवर छापा टाकल्यावर पोलिसांनी महिलेचा मोबाइल जप्त केला. यावेळी त्यांच्या व्हॉट्सॲप चॅटमधून दिल्लीतील कृष्णकुमार यांच्या माध्यमातून विदेशी महिलांना नागपुरात पाठवीत असल्याची माहिती समोर आली.