हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? ‘जय गुजरात’च्या घोषणेवर संजय राऊतांचा सवाल
GH News July 04, 2025 08:08 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यात जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला. यावरुन राजकारण तापलं आहे. एकनाथ शिंदेंच्या या घोषणेवर संजय राऊतांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात म्हटले की, पुण्याती कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, ‘या वास्तूचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांनी केले आणि लोकार्पण अमित शहा यांनी केले. मोदींनी हाती घेतलेले काम नेहमीच पूर्णत्वास जाते. गुजराती बांधव हे लक्ष्मी पुत्रच आहेत. एकता आणि अखंडतेचे हे प्रतीक आहे. अमित शाह हे देशसेवेसाठी समर्पित आहेत’

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, माझ्या निर्णयामध्ये अमित शहा दगडासारखे माझ्या मागे उभे होते. अमित शहा महाराष्ट्राचे जावई आहेत. कारण त्यांच्या होम मिनिस्टर कोल्हापूरच्या आहेत. गुजराती बांधवांनी एकजूट कायम ठेवावी. राज्याच्या प्रगतीमध्ये तुमचा वाटा आहे. यानंतर भाषण संपवताना एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली.

काय म्हणाले संजय राऊत? 

यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, ‘अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले. पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर ‘जय गुजरात’ ची गर्जना केली. काय करायचं? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा. हजार माराव्या आणि एक मोजाव्या. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?’ असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे.

शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले – पेडणेकर

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही शिंदेंवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘शिंदे स्वता:ला मूळचे शिवसैनिक समजतात असं लोकांना भासवतात. पण आज ते अमित शहा यांच्यासमोर लाचार कसे झाले हे त्यांनी दाखवलं. हिंदीसोबत आता गुजराती शिकण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देत आहात काय? बाळासाहेबांचे विचार म्हणून तुम्ही पुढे येता बाळासाहेबांचा जय गुजरात कधीच नव्हता. ज्यांचा जन्म महाराष्ट्र ते जय गुजरात कसं बोलतील असा सवालही पेडणेकर यांनी केला आहे.

शिंदे साहेबांवर शंका घेण चुकीचं – योगेश कदम

याबाबत बोलताना मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं की, ‘एकनाथ शिंदे साहेबांवर शंका व्यक्त करण म्हणजे आकाशावर थूंकण आहे. शिंदे साहेबांवर शंका घेण चुकीचं आहे. ज्या व्यक्तीने हिंदूत्वाचं सरकार आणलं त्याच्यावर शंका घेण चुकीचं.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.