चार्दम यात्रा पुन्हा तात्पुरते थांबविण्यात आले
Marathi July 05, 2025 04:25 AM

मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला निर्णय

वृत्तसंस्था/देहराडून

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. सततच्या पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या समस्या तीव्र झाल्यानंतर चारधामला जाणाऱ्या भाविकांना अनेक अडचणी येत आहेत. याचदरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी चारधाम यात्रा तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर प्रवास सुरक्षित झाल्यावर पुन्हा यात्रा सुरू केली जाणार आहे. या प्रवासादरम्यान सर्व यात्रेकरूंची सुरक्षितता ही प्राथमिकता आहे. आमची सर्व आपत्ती व्यवस्थापन पथके, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके पूर्णपणे तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील बद्रीश हॉटेलजवळ भूस्खलन झाल्याचे दिसून आले आहे. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. संततधार पावसामुळे सिलई बंद आणि ओजरी दरम्यान महामार्गाचा काही भाग वाहून गेला आहे. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग दोन ठिकाणी बंद आहे. मार्ग पूर्ववत करण्यासाठी वेळ लागू शकतो. परिस्थिती हाताळण्यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफ, पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. अडकलेल्या पर्यटक, भाविक आणि स्थानिक लोकांना तात्पुरत्या मार्गाने जाण्यास मदत केली जात आहे.

सोनप्रयागमध्ये अडकलेल्या 40 जणांची सुटका

सोनप्रयागमध्ये सततच्या पावसामुळे भूस्खलन झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे केदारनाथहून परतणारे 40 हून अधिक भाविक अडकले होते. सोनप्रयाग भूस्खलन क्षेत्राजवळ अडकलेल्या 40 भाविकांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (एसडीआरएफ) यशस्वीरित्या वाचवले आहे. भूस्खलनातंर रस्ता बंद झाला आणि अचानक ढिगारा पडल्याने अनेक भाविक तिथे अडकले. या घटनेनंतर एसडीआरएफच्या पथकांना तातडीने घटनास्थळी पाठवून रात्री यात्रेकरूंना वाचवण्यासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.