बागेश्वर धाम, मध्य प्रदेश भक्त मध्ये अपघात मरण पावला
Marathi July 04, 2025 10:25 PM

वृत्तसंस्था/छतरपूर

मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम परिसरात गुरुवारी दुर्घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी आरतीदरम्यान अचानक एक तंबू कोसळला आणि खळबळ उडाली. या दुर्घटनेत एका भाविकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. जोरदार वाऱ्यामुळे एक मोठा तंबू अचानक कोसळला, काही लोक त्याखाली सापडल्याने खळबळ उडाली. तंबू उभा करण्यासाठी वापरण्यात आलेला लोखंडी रॉड कपाळावर पडल्याने एका भाविकाचा मृत्यू झाला. तर अन्य जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असून यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासन व धाम व्यवस्थापन समितीने तत्काळ मदत अन् बचावकार्य सुरू केले. तर पोलिसांनी तेथे धाव घेत स्थितीला नियंत्रित केले. या दुर्घटनेत श्याम लाल कौशल यांचा मृत्यू झाला. कौशल हे अयोध्येतील रहिवासी होते. छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाममध्ये शुक्रवारी हजारोंच्या संख्येत भाविक पोहोचणार आहेत. शुक्रवारी बागेश्वरधामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्राr यांचा जन्मदिन आहे. यामुळे गुरपौर्णिमेपर्यंत तेथे विशेष धार्मिक आयोजन होतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.