वृत्तसंस्था/कोलकाता
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार समिक भट्टाचार्य यांची पश्चिम बंगालमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. नामांकनाच्या अंतिम मुदतीपर्यंत या पदासाठी इतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याने ते बिनविरोध निवडून आले. भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रविशंकर प्रसाद राष्ट्रीय निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी समिक भट्टाचार्य यांना निवडणुकीचे प्रमाणपत्र सुपूर्द केले. आता समिक भट्टाचार्य 2026 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करतील. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्षांची निवड झाली आहे.
समिक भट्टाचार्य यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1963 रोजी झाला होता आणि ते सध्या पश्चिम बंगालमधून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी 4 एप्रिल 2024 रोजी नवीन राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. 2014 ते 2016 पर्यंत समिक भट्टाचार्य हे बसीरहाट दक्षिण मतदारसंघातून पश्चिम बंगालच्या विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. ते 2020 ते 2024 पर्यंत पश्चिम बंगाल भाजपचे मुख्य प्रवक्ते म्हणूनही सक्रिय होते. 2024 मध्ये भाजपने त्यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार बनवले होते.