जय गुजरात का म्हटलं? एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ दाखवत दिलं स्पष्टीकरण
Tv9 Marathi July 05, 2025 03:45 AM

एकनाथ शिंदेंनी पुण्यात जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात जय गुजरात असं म्हटलं होत. शिंदे आपल्या भाषणात म्हणाले होते की, ‘या वास्तूचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांनी केले आणि लोकार्पण अमित शहा यांनी केले. मोदींनी हाती घेतलेले काम नेहमीच पूर्णत्वास जाते. अमित शाह हे देशसेवेसाठी समर्पित आहेत राज्याच्या प्रगतीमध्ये तुमचा वाटा आहे. यानंतर भाषण संपवताना एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली. यानंतर विरोधकांनी शिंदेंवर टीका केली होती. यावर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘पुण्यातील गुजराती बांधवांनी एक कॉम्प्लेक्स उभारलं आहे. याचं आज लोकार्पण करण्यात आले. माझ्या भाषणाच्या शेवटी मी जय हिंद, जय महाराष्ट्र असं म्हणतो. जय हिंद म्हणजे देशाच्या अभिमान, जय महाराष्ट्र म्हणजे राज्याचा अभिमान. आज पुण्यातील गुजराती लोकांसाठी कार्यक्रम होता. गुजराती लोकांनी महाराष्ट्राला कर्मभुमी मानली आहे, त्यामुळे मी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असं म्हटलो.’

एक तर हे भोंदू आहेत, नाही तर संधीसाधू! pic.twitter.com/mXEtLx25xK

— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc)

यानंतर पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी ‘उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ जुना व्हिडिओ दाखवला, ज्यात उद्धव ठाकरे हेही जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असं म्हणत आहे. तसेच शिंदेंनी आणखी एक पत्र दाखवले, ज्यात मुंबई मा जलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असं लिहिलेलं आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंचा एक पोस्टर दाखवत त्यावर केम छो वरळी असं लिहिलेलं आहे असंही शिंदेंनी सांगितलं.

पुढे बोलताना शिंदे यांनी म्हटलं की, ‘जे आमच्यावर बोलत आहेत, त्यांनी आरसा पहावा, मराठी बद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण केलं जात आहे. गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या विचारांची ही शिवसेना आहे. त्यामुळे मी आधी जय हिंद म्हणालो, जय महाराष्ट्र म्हणालो’ असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.