मुंबईतील वरळी डोममध्ये शनिवारी (5 जुलै) सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा भव्य विजयी मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. या मेळाव्याला हजर राहण्याचे आवाहन मराठी जनतेला करण्यात आलं आहे. यापूर्वी ठाकरे गटाने हिंदी सक्तीच्या GR ची होळी केली होती आणि आता विजयी मेळावा पार पडणार आहे. यावर आमदार आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
मेळाव्याला देशभरातून लोकं येणार
वरळी डोममध्ये होणाऱ्या ऐतिहासिक मेळाव्याबाबत बोलताना आदित्य ठाकरेंनी सांगितले की, ‘मेळाव्याची तयारी चालू आहे. गर्दीचा अंदाज आम्हाला येत आहे. हा आनंदोत्सव देशभरातून महाराष्ट्रातून लोकं येणार आहेत. आमचे मन मोठे आहे. यात सर्वांना जागा मिळेल.’
आमच्या अंगावर आलात तर…
ठाकरे गटाकडून आठवडाभरापूर्वी हिंदी सक्तीच्या GR ची होळी करण्यात आली होती. राज्यातील विविध ठिकाणी GR जाळण्यात आला होता. त्यामुळे शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘आम्हाला पकडून दाखवा , आमच्या अंगावर आलात तर GR जाळत राहू.’
जय गुजरातवर भाष्य
एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात या घोषनेवर बोलताना आदित्य ठाकरेंनी म्हटले की, ‘पदासाठी काय काय करावं लागतं, झुकावं लागतं. ते म्हणाले होते की झुकेगा नाही, झुकले. उद्धव ठाकरे हेही जय गुजरात म्हटले होते, मात्र ती अमित शहा यांची नॉमिनेशन रॅली होती. आम्ही नेहमी म्हणतो ज्या राज्यात जाता त्यांचा सन्मान करा, मात्र हे पुण्यात जय गुजरात म्हणाले.’
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंनी पुण्यात जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात जय गुजरात असं म्हटलं होत. शिंदे आपल्या भाषणात म्हणाले होते की, ‘या वास्तूचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांनी केले आणि लोकार्पण अमित शहा यांनी केले. मोदींनी हाती घेतलेले काम नेहमीच पूर्णत्वास जाते. अमित शाह हे देशसेवेसाठी समर्पित आहेत राज्याच्या प्रगतीमध्ये तुमचा वाटा आहे. यानंतर भाषण संपवताना एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली होती.