राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. पहिली पासून हिंदी नको अशी मागणी होत होती. याचविरोधात पाच जुलै रोजी मोर्चा निघणार होता, या मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू सहभागी होणार होते. मात्र सरकारने त्रिभाषा सूत्राबाबत काढलेले दोन्ही जीआर रद्द केले आहेत. त्यामुळे पाच जुलै रोजी होणारा मोर्चा देखील रद्द करण्यात आला. मात्र आता उद्या विजयी मेळावा होणार आहे, या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू सहभागी होणार आहेत. मात्र या मेळाव्यापूर्वीच पुन्हा एकदा ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांना डिवचलं आहे, तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी मराठी संदर्भात एक पोस्ट केली होती, त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांना डिवचलं होतं. ‘गेली 30 वर्ष मुंबईत राहिल्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तुम्ही ज्या पद्धतीनं गैरवर्तन करत आहात ते पाहाता, जोपर्यंत तुमच्या सारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही काय करायचं बोला?’ असं ट्विट केडिया यांनी केलं होतं, यावर प्रतिक्रिया देताना शुलील केडिया जे म्हटले त्याचं मी समर्थन करतो, संविधानामध्ये म्हटलं आहे, भाषेबाबत कोणीही दबाव टाकू शकत नाही, म्हणून जे चाललं आहे ते चुकीचं चाललं आहे, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
दरम्यान उद्या मुंबईत विजयी मेळावा होणार आहे. त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत, यावरून देखील सदावर्ते यांनी टोला लगावला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जो मेळावा घेत आहे हे सेटलमेंट आहे, अशी टीका यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.