अजित पवारांना पद मिळालं पण कायदाच ठरणार अडचण? तक्रार केली आता…प्रकरण काय?
GH News July 05, 2025 09:06 PM

Ajit Pawar : काही दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळेच अजित पवार यांच्या नीळकंठेश्वर पॅनेलने 21 पैकी 20 जागा जिंकल्या. आता ठरल्याप्रमाणे या साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. मात्र ही निवड झालेली असली तरी बळीराजा पॅनेल आणि चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांनी अजित पवार यांनी नियमांच्या कात्रीत पकडण्याचा डाव आखला आहे. एका नियमाचा संदर्भ देत त्यांनी अजित पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतले आहेत.

नेमका काय आक्षेप घेतला?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदावर निवड करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या या निवडीवर चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी आक्षेप नोंदवला आहे. ब वर्गातून चेअरमन होता येत नाही असा चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचा दावा आहे. त्यामुळे चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी केलेल्या या दाव्याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी एकदाही कारखान्याला ऊस घातला नाही असाही आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकरी यांच्याकडे दाद मागितली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

निवडणुकीत नेमकं काय घडलं?

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. काहीही झालं तरी ही निवडणूक जिंकायचीच असा निश्चयच त्यांनी केला होता. विशेष म्हणजे मतदानाच्या काही दिवसांआधी अजित पवार यांनी सभा, बैठकांच्या माध्यमातून आमचेच पॅनेल कसे कारखान्याचा विकास, विस्तार करू शकते, असे त्यांनी मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी चंद्रावर तावरे यांच्या वयाचा सल्ला देत त्यांनी आता निवृत्ती घेण्याचाही सल्ला अजित पवार यांनी दिला होता. तर मी मरेपर्यंत निवडणूक लढवणार आहे, असा पलटवार चंद्रराव तावरे यांनी केला होता. त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला चांगलाच रंग आला होता.

निवडणुकीत काय निकाल लागला?

दरम्यान, या निवडणुकीत नीळकंठेश्वर पॅनेल आणि चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांच्या पॅनेलमध्ये प्रमुख लढत झाली. शरद पवार यांच्या बळीराजा पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. तर चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचा फक्त एका जागेवर विजय झाला. नीळकंठेश्वर पॅनेलने 21 पैकी 20 जागा खिशात घालून ही निवडणूक जिंकली होती. आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.