सायकल ट्रॅकवरच पार्किंग अन् राडारोडाही सायकलस्वारांकडून नाराजी ः विजेचे खांब, डीपी बॉक्स, बाकांचे अडथळे
esakal July 06, 2025 03:45 AM

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. ३ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील विविध रस्त्यांवर ‘सायकल ट्रॅक’ तयार करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात हे ट्रॅक सुरक्षित व सलग नाहीत. त्यावर वाहनांचे पार्किंग, अतिक्रमण, राडारोडा, विजेचे खांब, डीपी बॉक्स, झाडे, बाके, कठडे, फलक यासारखे अनेक अडथळे आहेत. फक्त अर्बन स्ट्रीट डिझाइन आणि सायकल ट्रॅक केवळ शोभेचे डिझाइन बनले आहेत. परिणामी, ट्रॅकवरून सायकलस्वारांना सायकल चालविता येत नाही. त्यामुळे ते नाराजी व्यक्त करीत आहे.
शहरात ४५ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर स्वतंत्रपणे सायकल ट्रॅक बनविण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी कमी रुंदीचे रस्ते आहेत. तेथे लाल रंगाचे पट्टे तयार करून, सायकल ट्रॅक तयार करण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. शहरातील विविध रस्त्यांवर एकूण ३८ किलोमीटर सायकल ट्रॅक तयार करण्यात आल्याचा दावा स्थापत्य विभाग करीत आहे. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. तर, नव्याने अंदाजे ४० किलोमीटर सायकल ट्रॅकचे काम सुरू आहे. काही सायकल ट्रॅक महापालिकेने अर्बन स्ट्रीट डिझाईनच्या रस्त्यांवर केले आहेत. आणखी काही रस्त्यांवर ट्रॅक बनविण्यात येणार आहेत. परंतु, सायकल ट्रॅक एकसलग नसल्याने अनेक अडथळ्यांचा सामना सायकल चालविताना नागरिकांना करावा लागत आहे.
ट्रॅकवर मध्येच झाड, बाके, कठडा, डीपी बॉक्स, दिव्याचा खांब, पार्क केलेले वाहन, विक्रेते, दुकानदारांचे साहित्य, राडारोडा, कचऱ्याचे ढीग, उघड्या वीजवाहक केबल, अतिक्रमण असे अनेक अडथळे आहेत. त्यामुळे सायकलस्वारांना सुरक्षितपणे सायकल चालविता येत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव सायकलस्वारांना रस्त्यावरून जावे लागते. परिणामी, सायकल ट्रॅकसाठी केलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. त्या कारणांमुळे सायकल ट्रॅक असूनही ते सायकल चालविण्यासाठी उपयुक्त ठरत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

पालिकेने विषय गांभीर्याने घ्यावा
शहरातील सायकल ट्रॅकची अवस्था गंभीर आहे. महापालिका प्रशासनाचे त्याकडे लक्ष नाही. सायकल ट्रॅकच्या स्वतंत्र मार्गावर कोणतेही वाहन जाऊ नये, अशी ट्रॅकची रचना असावी. महापालिकेने शहरात केवळ रस्त्यांच्या बाजूला लाल पट्टे मारून सायकल ट्रॅक असे फलक लावले आहेत.


शहरातील या रस्त्यांवर सायकल ट्रॅक
सांगवी फाटा ते साई चौक
नाशिक फाटा ते वाकड
काळेवाडी फाटा ते एमएम स्कूल
चिंचवडगाव ते वाल्हेकरवाडी चौक
केएसबी चौक ते कुदळवाडी
एम्पायर इस्टेट ते ऑटो क्लस्टर चौक
निगडी भक्ती-शक्ती चौक ते रावेत पूल
पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव
नवी सांगवी
मगर स्टेडियमजवळ
शाहूनगर चिंचवड

कोट
‘‘महापालिकेने नागरिकांच्यासाठी अर्बन स्ट्रीट डिझाइनप्रमाणे रस्ते बनविलेले आहेत. त्या बनविलेल्या सायकल ट्रॅकवर अतिक्रमण होत आहे. शाहूनगर चिंचवड येथील सायकल ट्रॅकवर होणाऱ्या अतिक्रमणाला प्रतिबंध कोणी करणार आहे आणि या सायकल ट्रॅकवर चार चाकीसाठी पार्किंगबरोबर हळूहळू व्यवसाय थाटण्यात येतील. याला वेळीच आळा घालावा.
-बी. एस. पाटील, नागरिक, शाहूनगर

फोटोः 28359

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.