गौरी देशपांडे-gaurisdeshpande1294@gmail.com
इस्मत त्या दिवशी खूप गडबडीत होता. दुसऱ्या दिवशी ईद असल्याने दिवसभर लोक त्याच्याकडे येत होते आणि नवीन जोडे पायात घालून बघत होते. सगळ्या जोड्या विकल्याही गेल्या होत्या. त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. तसा इस्मत चर्मकार हा नेहमी आनंदी असलेला संतुष्ट माणूस होता, पण आजच्या आनंदाचं कारण म्हणजे, सगळ्या जोड्यांची विक्री झाल्यामुळे आता ईदनिमित्त आपल्या कुटुंबीयांसाठी तो भेटवस्तू खरेदी करू शकणार होता.
त्याने त्याचं छोटंसं दुकान बंद केलं आणि तो निघाला हमझाच्या दुकानाकडे. सलामांची देवाण-घेवाण झाल्यावर इस्मतने त्याच्या बायकोसाठी, अम्मासाठी आणि मुलीसाठी भेटवस्तू घ्यायचा त्याचा बेत त्याने हमझाला सांगितला. बायकोसाठी जांभळट निळ्या रंगाचा एक बुरखा त्याने पसंत केला. अम्मासाठी छोटे मणी लावून भरतकाम केलेला निळा दुपट्टा घेतला. आता मुलीसाठी बांगड्या बघायच्या त्याने ठरवलं, तेव्हा हमझाने त्याला शेकडो बांगड्या दाखवल्या. त्या सगळ्याच इतक्या सुंदर होत्या की, यातल्या नेमक्या कोणत्या निवडाव्यात हे ठरवताना इस्मतची मोठी पंचाईत झाली. अशा सगळ्या सुंदर भेटवस्तू घेऊन तो दुकानातून निघणार, तेवढ्यात त्याला हमझाने आवाज दिला.
‘‘इस्मत, अरे तू स्वतःसाठी तर काहीच घेतलं नाहीस. तुझी विजार जुनाट झालीये. किती ठिगळं लावलीयेस तू! तू नवीन विजारच का घेत नाहीस?’’ इस्मतने जरा विचार केला आणि विजार घ्यायची असं ठरवलं, पण हे काय? हमझाच्या दुकानात आता एकच विजार शिल्लक होती. ती तरी घेऊया म्हणून त्याने आधी कमरेपाशी लावून पाहिली, पण हे काय? ती तर चार बोटं जास्त लांबीची होती. ‘हरकत नाही. हमझा आपल्या मापाप्रमाणे आखूड करून देऊच शकेल की!’ इस्मतने विचार केला, पण दुसऱ्या दिवशी ईद असल्याने हमझाही गडबडीत होत. इस्मतने त्याच्या बायकोची मदत घ्यावी असं हमझाने सुचवलं.
‘‘खरंच की! तसंच करतो!’’ असं म्हणून इस्मतने हमझाचा निरोप घेतला. घरी आल्यावर त्याने बायकोसाठी - यास्मिनसाठी आणलेला बुरखा तिला दिला. बुरखा बघून ती अगदी खूश झाली. कारण तो तिचा आवडता रंग होता. तिने तो लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे ईदच्या दिवशी घालायचं ठरवून टाकलं.
‘‘आणि तुमच्यासाठी काय आणलंत?’’इस्मतने चार बोटं जास्त लांबीच्या त्याच्या नव्या विजारीबद्दल तिला सांगितलं, पण उद्या ईदसाठी तिला बिर्याणी करायची असल्याने इस्मतची विजार कापून त्याच्या मापायोग्य करायला यास्मिनला सवडच नव्हती. त्याने त्याच्या अम्माची मदत घ्यावी असं तिने सुचवलं. ‘‘ठीक आहे. तसंच करतो,’’ असं म्हणून इस्मत अम्माच्या घरी तिला भेटायला गेला. त्याने अम्माला- हबीबाला तिच्यासाठी आणलेला दुपट्टा दिला. दुपट्टा बघून अम्माला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी ईदलाच तो वापरायचा असं तिने मनाशी ठरवलं व विचारलं, ‘‘आणि तुझ्यासाठी काही आणलंस की नाही?’’ इस्मतने चार बोटं जास्त लांबीच्या विजारीची गोष्ट तिला सांगितली, पण दुसऱ्या दिवशीच्या ईदसाठी हबीबाला शिरकुर्मा तयार करायचा होता. त्यामुळे इस्मतला मदत करायला तिला वेळच नव्हता. आपल्या लेकीची मदत घ्यावी असं अम्माने सांगितलं.
‘‘हो. आता तेच करतो!’’ असं म्हणून इस्मत त्याच्या मुलीच्या - माहजबीनच्या घरी गेला. त्याने तिच्यासाठी आणलेल्या बांगड्या तिला दाखवल्या. एवढ्या रंगीबेरंगी बांगड्या बघून तिला भारी आनंद झाला. दुसऱ्या दिवशी ईदला नवीन कपड्यांसोबत या बांगड्या घालायचं असं तिने ठरवलं. ‘‘तुमच्यासाठी काय घेतलंत अब्बू?’’ तिने विचारलं. विजारीची कहाणी पुन्हा एकदा सांगून त्याने विजार तिच्यासमोर धरली, पण ईदसाठी समोसे करायचे असल्याने आणि तिला एक लहान बाळ असल्याने तिला अजिबात फुरसत मिळणार नव्हती. इस्मत घरी आला. त्याने स्वतःच मग आपली विजार चार बोटे कापून, कडांना नीट शिवण घालून, घडी घालून ठेऊन दिली. त्यानंतर तो गावातल्या गरीब आणि आजारी लोकांना ईदसाठी पैसे द्यायला जाणार आहे असं त्यानं यास्मिनला सांगितलं आणि तो बाहेर पडला. इस्मत गेल्यावर काही वेळानं यास्मिनच्या मनात आलं की, इस्मत हा किती चांगला नवरा आहे. त्याला आपण मदत करायला हवी होती. मग तिने लागलीच विजार घेतली आणि खालच्या कडेपासून तिची उंची चार बोटे कमी केली. मग घडी घालून ती विजार टेबलावर ठेवली आणि ती तिच्या कामासाठी स्वयंपाकघरात निघून गेली.
इकडे हबीबाने विचार केला की, ‘इस्मत हा किती चांगला मुलगा आहे! आपण थोडा वेळ त्याच्यासाठी द्यायला हवा होता.’ ती तडक इस्मतच्या घरी गेली. टेबलवर ठेवलेली विजार घेऊन तिने ती खालून चार बोटे कापून टाकली, कडा नीट शिवल्या आणि घडी घालून पुन्हा टेबलावर ठेऊन दिली. मग ती तिच्या घरी निघाली. माहजबीनला समोशाची तयारी करताना वाटलं की, ‘अब्बू किती चांगले आहेत. आपण त्यांच्यासाठी एवढी छोटी गोष्ट तर करायला हवीच होती.’ ती लगेच निघाली आणि इस्मतच्या घरी पोहोचली. विजार उचलून तिने ती चार बोटे कमी केली, कडा दुमडून शिवल्या आणि नीट घडी करून ठेऊन दिली. मग परत घरी जाऊन ती समोशांच्या तयारीला लागली.
सगळे जण रात्री ईदच्या तयारीने दमून, दुसऱ्या दिवशीची उत्साहाने वाट बघत अगदी निश्चिंत मनाने झोपले. इस्मत, त्याचं हे छानसं कुटुंब यांची सुरेख चित्र काढलीयत प्रोईती रॉय यांनी. ही आहे एक तुर्की गोष्ट जिचं पुनर्कथन केलं आहे फौझिया गिलानी- विल्यम्स यांनी. या धमाल गोष्टीचा मराठी अनुवाद स्नेहलता दातार यांनी केला असून, हे पुस्तक तुलिका प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. आता दुसऱ्या म्हणजे ईदच्या दिवशी काय झालं असेल, याची तुम्हाला कल्पना आलीच असणार! हो! अगदी तसंच झालं! नवीन बुरखा घालून तयार झालेली यास्मिन, निळा दुपट्टा लेऊन आलेली अम्मा आणि रंगीत बांगड्या घालून नटलेली महजबीन या सगळ्यांनी अगदी उत्साहाने इस्मतला त्याची विजार घालून तयार व्हायला सांगितलं. त्याने विजार घातली आणि,
‘‘ओह… आऽऽऽ ह! या अल्लाह!’’
काय झालं म्हणून सगळ्या बघतात तर काय? इस्मतची नवी विजार आता चक्क त्याच्या गुडघ्यापर्यंतच येत होती! हे कसं झालं?
‘‘मी तर फक्त चार बोटेच कापली होती!’’ यास्मिन म्हणाली.
‘‘मीसुद्धा फक्त चार बोटेच उंची कमी केली होती!’’ हबीबा म्हणाली.
‘‘मी पण चारच बोटे कापून विजार तोकडी केली होती!’’ माहजबीन म्हणाली.
‘‘पण मी तर तुम्हा सगळ्यांआधीच चार बोटे कापून विजारीची उंची कमी केली होती!’’ इस्मत हताशपणे म्हणाला.
आता? काय करावं, काय बोलावं, कोणाला काही सुचेना! काही क्षणांच्या शांततेने मग इस्मतलाच हसू आलं आणि मग सगळ्याच जणी त्याच्या हसण्यात सामील झाल्या! मग त्या तिघींनी मिळून कापलेले तुकडे पुन्हा जोडले आणि ती विजार इस्मतला अगदी बरोबर बसली!
Premium| Cricket transition phase: भारतीय क्रिकेटमध्ये आव्हानात्मक संक्रमण काळ सुरू!इस्मतला हसू फुटलं? आश्चर्यच! असं काही माझ्याबाबतीत घडतं तर मी मात्र नुसती चिडचिड, रडारड केली असती, गोंधळ घातला असता! ते म्हणतात ना, ओढवलेल्या प्रसंगांपेक्षा आपण त्या प्रसंगांना दिलेली प्रतिक्रिया आणि प्रतिसादच खरा महत्त्वाचा! हो! एखाद्याची ईद अगदी कडू होऊन जायची अशा वेळी, पण इस्मतचा शांत स्वभाव कामी आला आणि त्याने अडचणीचा अजिबात बाऊ न केल्यानं त्याची अडचण दूरसुद्धा झाली! मग नवीन विजार घालून, आपल्या लाडक्या कुटुंबासोबत प्रसन्नपणे तो मशिदीत गेला!