पंढरपूर : महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी आणि सर्वांना सन्मार्गाने चालण्याची पांडुरंगाने सुबुद्धी द्यावी, असे साकडे विठुरायाला घातल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. फडणवीस यांनी आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी विठुरायाला साकडे घातले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंढरीच्या वारीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. ही वारी (Pandharpur Wari) कधीही थांबली नाही. इंग्रजांच्या काळात देखील ही परंपरा सुरूच राहिली होती. आताच्या काळामध्ये वारीपरंपरेचे महत्त्व वाढले आहे. शासन देखील या वारीपरंपरेत सहभागी झाले आहे.
वारकऱ्यांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी लवकरच मंदिर परिसरामध्ये स्थानिकांना विश्वासात घेऊन कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. तसेच वारीत कोणालाही येण्याचा अधिकार आहे, मात्र जर कोणी विशेष असा अजेंडा चालवण्यासाठी येणार असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला.