कात्रज - महापालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. आंबेगावमधील दत्तनगर ते जांभुळवाडी रस्त्यावर काँक्रीटीकरण करण्याचे काम भर पावसात केल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रेडीमिक्स काँक्रीट टाकल्यानंतर अवघ्या काही तासांत झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील संपूर्ण सिमेंट वाहून गेले आहे. त्यामुळे रस्त्याची स्थिती अधिक बिकट झाली आहे.
यापूर्वी रस्त्यावर ब्लॉक टाकलेले होते. ड्रेनेज लाईनच्या कामासाठी ते उखडण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याऐवजी भर पावसात तातडीने काँक्रीटीकरण सुरू करण्यात आले. परिणामी, पावसाच्या पाण्याने सिमेंट वाहून गेलं आणि रस्ता आधीपेक्षा खराब झाला.
पथविभागाचे उपअभियंता दिलीप पांडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रस्ता ड्रेनेज विभागाने खोदला होता. त्याच विभागाने पुढे काँक्रीटीकरणाचे काम करणे अपेक्षित असल्याने त्यांनीच हे काम सुरू केले होते. मात्र, योग्य नियोजन आणि हवामानाची काळजी न घेतल्यामुळे हा सारा प्रयत्न वाया गेला आहे.
मात्र, या घटनेवरून प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर आणि जबाबदारीचे भान नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. पावसाळ्यात अशी कामे करणे म्हणजे जनतेच्या पैशाची हानी असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. महापालिका अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार ठेकेदार आणि कंत्राटदारावर तातडीने कारवाई करत या रस्त्याची योग्य दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
रस्त्यावरील पूर्ण सिमेंट वाहून गेले आहे. काँक्रीटीकरण करण्याआधीच तिथे माती आणि चिखल होता. रात्री हे काम सुरू केलं आणि सकाळी ते वाहून गेलं. यामध्ये नागरिकांच्या पैशांचा केवळ अपव्यय झाला आहे. जांभुळवाडी रस्त्याची ही दुरवस्था प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाली आहे.
- स्वप्निल लिपाणे, स्थानिक रहिवासी
काम चालू केल्यानंतर अचनाक पाऊस सुरु झाला. त्यानंतर काही वाहनचालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर, आम्ही कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणीही केली आहे. सदर ठेकेदाराला पुन्हा हे काम व्यवस्थित करण्यासंदर्भात सूचना दिल्या असून लवकरच हे काम व्यवस्थित पूर्ण करुन घेणार आहोत.
- सिद्राम पाटील, शाखा अभियंता, मलनिसःरण विभाग.