महाड, ता. ५ (बातमीदार) : तालुक्यात पावसाळ्यात अनेक धबधबे व ओसंडून वाहणारी धरणे पर्यटकांना आकर्षित करीत असतात; मात्र अतिउत्साहात बेशिस्त वागण्यामुळे अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाड तालुक्यातील पर्यटनस्थळे आणि त्याच्या एक किलोमीटर परिसरात गुरुवारपासून (ता. ३) ३१ ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी जीवित व वित्तहानी होऊ नये, तसेच सरकारी व खासगी मालमत्तेचे नुकसान होऊ नये, पर्यटकांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहावी, यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आल्याचे महाड उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे यांनी सांगितले.
महाड तालुक्यात मांडले, केंबुर्ली, वाकी बु. नानेमाची, भावे, शेवते अडराई व रानवडी येथे पावसाळ्यात नैसर्गिक धबधबे तयार होतात. तसेच कोतुर्डे, वरंध, खैरे, कुर्ले, खिंडवाडी येथे धरणाची ठिकाणे आहेत. या ठिकाणी प्रांताधिकारी ओमासे यांनी बंदीआदेश लागू केले आहेत. पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधबे, धरण परिसरामध्ये मद्यपान, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक, मद्य विक्री याला मज्जाव करण्यात आला आहे. धोकादायक ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण, फोटोग्राफी करण्यास बंदी घातली आहे. परिसरात खोल पाण्यात उतरणे, पोहणे, धबधब्यावर जाणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या, थर्माकोलचे साहित्य फेकणे, महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल, अशी कोणतीही कृती करणे, धबधब्याच्या/धरणाच्या एक किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, चार व सहाचाकी वाहनांना प्रवेश (अत्यावश्यक सेवा वगळून) बंदी असून नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे यांनी केले आहे.
महाड ः केंबुर्ली येथील धबधबा
.................