शहापूर, ता. ५ (वार्ताहर) : तालुक्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व अत्याधुनिक साहित्यासह अतिदक्षता विभाग नसल्याने अतिगंभीर रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्याने ठाणे, कल्याण तसेच मुंबईतील रुग्णालयांमध्ये जावे लागते. या प्रवासात अनेकांना जीव गमवावा लागला असल्याने अतिदक्षता विभाग सुरू करण्याची मागणी सातत्याने होत आहे.
शहापूर तालुक्यात २२८ गावे आणि ३६५ पाडे १०७ ग्रामपंचायती, दोन ग्रामदान मंडळे, एक नगर पंचायत आहे. आरोग्यसेवेसाठी शहापूर शहरात तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील खर्डी येथे उपजिल्हा रुग्णालय व किन्हवली, अघई, डोळखांब, कसारा, शेंद्रूण, शेणवे, टाकीपठार, टेंभे ,वासिंद येथे नऊ आरोग्य केंद्रे अशी आरोग्यसेवा कार्यरत आहे. शहापूरसारख्या ग्रामीण व दुर्गम भागातून मुंबई आग्रा महामार्ग, रेल्वे व समृद्धी महामार्ग जात असल्याने येथे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळणे गरजेचे असते, पण अतिदक्षता विभाग नसल्याने रुग्णांना कल्याण, ठाणे, मुंबईच्या शहरांमधील रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी हलवावे लागते, परंतु प्रवासात उपचारांअभावी अनेकांचे जीव जात आहेत. वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेकांचे बळी जात आहेत. शहापूर तालुक्यासाठी विशेष बाब दर्शवून अतिदक्षता विभाग मंजूर करण्याची मागणी होत आहे.
--------------------------------------
मंजूर पदे भरण्याकडे दुर्लक्ष
सर्पदंश, अपघातग्रस्त, साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. मृत्यूदर, बालमृत्यू, अर्भक, मातामृत्यूचे घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने पावले उचलणे गरजेचे आहे. शहापूर येथील रुग्णालयात फिजिशियन, पेडित्रिक, गायनोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, अनेस्थेतजिस्ट, फिजिओलॉजिस्ट, फॉरेन्सिक सारख्या तज्ज्ञ डॉक्टरांची मंजूर पदे अजूनही भरलेली नाहीत. राज्य सरकार व जिल्हा परिषद आरोग्यसेवेवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करतात, पण गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत.
-------------------------------
शहापूर येथे अतिदक्षता विभाग सुरू करण्यात यावा, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- सुरेश म्हात्रे, खासदार
------------------------------------------
उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागासाठी डॉक्टर, अत्याधुनिक साहित्याची मागणी केली आहे.
-डॉ. आशिलाक शिंदे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, शहापूर