Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?
esakal July 05, 2025 11:45 PM

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात फरार घोषित नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी भारत सरकारला माहिती दिली आहे की फरार उद्योगपती नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी याला शुक्रवारी (४ जुलै २०२५) अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. भारतातील दोन प्रमुख एजन्सी, ईडी आणि सीबीआय यांनी केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.

भारतातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात नेहल मोदी हवा आहे. त्याचा भाऊ नीरव मोदीसाठी काळा पैसा पांढरा करण्यात आणि लपवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तपासात उघड झाले आहे. ईडी आणि सीबीआयच्या तपासात असेही आढळून आले आहे की, नेहल मोदीने अनेक शेल कंपन्यांद्वारे मोठ्या प्रमाणात पैसा परदेशात हस्तांतरित केला. त्याचा उद्देश फसवणुकीने कमावलेले पैसे ट्रॅकपासून दूर ठेवणे हा होता.

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

१७ जुलै २०२५ रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. त्या दिवशी अमेरिकन न्यायालयात स्टेटस कॉन्फरन्स आयोजित केली जाईल. त्या दिवशी नेहल मोदी देखील जामिनासाठी अर्ज करेल अशी अपेक्षा आहे. परंतु अमेरिकन सरकारचेवकील त्याला विरोध करतील. भारत सरकार नेहल मोदीला शक्य तितक्या लवकर भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून त्याच्यावर देशाच्या कायद्यानुसार खटला चालवता येईल.

अमेरिकन अभियोक्त्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दोन आरोपांच्या आधारे प्रत्यार्पणाची कारवाई केली जात आहे. पहिला आरोप आहे - मनी लाँड्रिंग, जो भारताच्या "प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट, २००२" च्या कलम ३ अंतर्गत येतो. दुसरा आरोप आहे - गुन्हेगारी कट, जो भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम १२०-ब आणि २०१ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.