नालासोपाऱ्यात भीषण दुर्घटना घडली आहे. अल्कापुरी परिसरात 4 मजली इमारत पत्यासारखी कोसळली आहे. साई राज 2 असे या इमारतीचे नाव असून, काल रात्री ही इमारत एका बाजूला झुकली होती आणि आज कोसळली. ही इमारत अनधिकृत असून 20 ते 25 वर्षांपूर्वीची जुनी आहे अशी माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार काल ही इमारत एका बाजूला झुकली होती. त्यामुळे वसई-विरार महापालिकेने काल रात्रीच तात्काळ पावले उचलत सर्व 30 कुटुंबांना सुरक्षितरीत्या बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले होते. त्यानंतर आणि आज दुपारी चारच्या सुमारास ही इमारत पूर्णपणे कोसळली कोसळली आहे. इमारत रिकामी होती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या दुर्घटनेमुळे शेजारील कुसुम अपार्टमेंटचे नुकसान झाले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या असून, त्यातील किमान 4 ते 5 इमारती धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या इमारतींवर प्रशासन कारवाई करणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अंबरनाथमध्ये घराची भिंत कोसळली
अंबरनाथ शहरात रिमझिम पावसामुळे एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली.त्यामुळे घरातल्या सामानाचं मोठं नुकसान झालं आहे. गांधी नगरमध्ये नाल्याच्या बाजूला हे घर होते. रिमझिम पावसामुळे मागच्या नाल्याचा प्रवाह वाढला त्यामुळे माती खचत गेली, यामुळे आज दुपारी 3.30 वाजता याठिकाणी घराची मागची भिंत अचानक कोसळली. या घटनेत एक महिला थोडक्यात बचावली आहे.
नाल्याच्या बाजूला पालिकेने संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे मात्र ती अर्धवट असल्याने ही दुर्घटना घडल्याचे स्थानिक लोकांनी म्हटले आहे. त्यामुळे नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी घराच्या मालकाने केली आहे.