ऑस्ट्रेलियन खासदारांच्या शिष्ठमंडळ भारत दौऱ्यावर आले आहे. या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी नवी दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट दिली. यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी या खासदारांनी महान भारतीय संस्कृती अनुभवली.
या शिष्टमंडळात खासदार ली तारलामिस, पॉलिन रिचर्ड्स, बेलिंडा विल्सन, शीना वॅट, जुलियाना एडिसन यांचा समावेश होता. अक्षरधाम मंदिर परिसरातील स्थापत्यशैलीने हे सर्वजण प्रभावित झाले. यावेळी या खासदारांनी भारत आणि ऑस्ट्रेलियामधील वाढत्या संबंधांवर प्रकाश टाकला.
यावेळी बोलताना ली तारलामीस यांनी म्हटले की, ‘अध्यात्मिक अनुभवाबद्दल धन्यवाद. आज मानवतेला एकत्र आणणारी खरी मूल्ये अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आम्हाला मदत झाली. आता मला गुजरातमधील अक्षरधामला भेट देण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
मेलबर्नमधील खासदार पॉलीन रिचर्ड्स यांनी या भेटीबाबत म्हटले की, ‘या ठिकाणाला भेट देऊन मला खूप आनंद झाला आहे. हे मंदिर श्रद्धा, आशा आणि वैश्विक दयाळूपणाचे एक सुंदर प्रतीक आहे.’ खासदार बेलिंडा विल्सन यांनी म्हटले की, आज ठिकाणाला भेट देणे हा एक सन्मान असून आनंदाचीही गोष्ट आहे. येथील लोकांचे आदरातिथ्य खूप हृदयस्पर्शी आहे.’
खासदार शीना वॅट यांनी म्हटले की, ‘आदरातिथ्याबद्दल धन्यवाद, तुम्ही तुमच्या सांस्कृतिक चालीरीती आमच्यासोबत शेअर केल्या. मेलबर्नमध्ये अक्षरधाम मंदिर बांधण्यासाठी मला प्रेरणा मिळाली आहे.’ खासदार जुलियाना एडिसन यांनी म्हटले की, ‘या सर्वात पवित्र ठिकाणी भेट देणे हा एक अविश्वसनीय अनुभव होता. येथे मिळालेली शिकवण मी नेहमी लक्षात ठेवेन.’