ENG vs IND : दुखापत महागात, कर्णधार संपूर्ण मालिकेतूनच बाहेर, या खेळाडूची टीममध्ये एन्ट्री, कॅप्टन कोण?
Tv9 Marathi July 06, 2025 01:45 AM

भारतीय कसोटी संघ शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळत आहे. वूमन्स टीम इंडियाने या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून अप्रतिम सुरुवात केली. तर इंग्लंडने तिसऱ्या आणि ‘करो या मरो’ सामन्यात विजय मिळवला.  मात्र त्यानंतरही टीम इंडिया या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. उभयसंघातील चौथा सामना हा 9 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी वूमन्स इंग्लंड टीमला मोठा झटका लागला आहे.

इंग्लंडची नियमित कर्णधार नॅट सायव्हर ब्रँट हीला दुखापतीमुळे मालिकेतील उर्वरित 2 सामन्यांमधून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे मालिकेत पिछाडीवर असलेल्या इंग्लंडच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नॅट सायव्हर ब्रँट हीला कंबरेत दुखापत झाली. त्यामुळे नॅटला तिसऱ्या सामन्याला मुकावं लागलं होतं. त्यानंतर आता मेडीकल रिपोर्ट आल्यानंतर नॅटला मालिकेतील उर्वरित सर्व सामन्यातही खेळता येणार नसल्याचं समोर आलं आहे. आता नॅटच्या अनुपस्थितीत टॅमी ब्यूमोंट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर नॅटच्या जागी संघात माईया बाउचियर हीचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.

माईया बाऊचियरबाबत थोडक्यात

माईया बाऊचियर हीने आतापर्यंत इंग्लंडचं 44 टी20i मध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. माईयाने या 44 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 722 धावा केल्या आहेत. माईयाचा टी 20i मधील 91 हा बेस्ट स्कोर आहे. तसेच माईयाने 2 कसोटी सामन्यांमध्ये 129 तर 17 एकदिवसीय सामन्यांमध्ये 482 धावा केल्या आहेत.

तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव

दरम्यान इंग्लंडने तिसऱ्या टी 20i सामन्यात भारतावर मात केली आणि मालिकेतील आव्हान कायम राखण्यात यश मिळवलं. इंग्लंडने भारतासमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं.त्यामुळे महिला ब्रिगेडला सलग तिसरा सामना जिंकून मालिका नावावर करण्याची सुवर्णसंधी होती. त्यानुसार स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या सलामी जोडीने अफलातून सुरुवात करुन दिली. या दोघींनी 85 धावांची भागीदारी केली. स्मृतीने 56 तर शफालीने 47 धावा केल्या.

इंग्लंडला मालिकेदरम्यान मोठा झटका

Nat Sciver-Brunt will miss the rest of the Vitality IT20 series against India due to the injury to her left groin she sustained in Bristol.

Tammy Beaumont will continue to captain in her absence, with Maia Bouchier replacing Sciver-Brunt in the squad. Sciver-Brunt is expected… pic.twitter.com/It4XBfPpMA

— England Cricket (@englandcricket)

भारताला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 12 धावांची गरज होती. टीम इंडियाने पहिल्या 5 बॉलमध्ये 6 रन्स केल्या. त्यामुळे शेवटच्या बॉलवर विजयसाठी 6 धावा पाहिजे होत्या. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौर शेवटच्या बॉलवर आऊट झाली. इंग्लंडने अशाप्रकारे 5 धावांनी भारतावर विजय मिळवला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.