मोठी बातमी! मेळाव्यानंतर घडामोडींना वेग, शिवसेना ठाकरे गटाकडून आता थेट भाजपच्या बड्या नेत्याला पक्षप्रवेशाची ऑफर
Tv9 Marathi July 06, 2025 01:45 AM

आज मुंबईमध्ये विजय मेळावा झाला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपस्थिती होती, या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण तब्बल वीस वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र आले.  ठाकरे बंधू नेमकी काय भूमिका मांडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान या मेळाव्यानंतर आता त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या अंधारे? 

दोन्ही ठाकरे एकत्र आले यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो, डोळ्याचे पारणं फिटलं.  वीस वर्ष लागले या कुटुंबाला एकत्र येण्यासाठी एका फ्रेममध्ये दिसण्यासाठी हा आनंद राज्याला साजरा करू द्या, अशी प्रतिक्रिया या मेळाव्यावर अंधारे यांनी दिली आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेना ठाकरे गटात येण्याची ऑफर दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांची स्थिती सध्या भाजपमध्ये चांगली नाही, त्यांनी शिवसेनेत यावं असं अंधारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे आजच्या विजयी मेळाव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही भाऊ एकत्र आले याचा आनंद आहे, मात्र यामुळे महायुतीचाच जास्त फायदा होणार आहे, असा दावा आठवले यांनी केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि तिसरा गट स्थापन होईल, त्याचा माहयुतीला फायदा होईल असं आठवले यांनी म्हटलं आहे.

सोबतच त्यांनी यावेळी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल देखील केला आहे,  आमचं पण मराठीवर प्रेम आहे. त्यांना मेळावा काढण्याचा अधिकार नाही. मराठी मणसांसोबतच इतर लोकांचं देखील योगदान आहे, असं यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.