मुंबईत झालेल्या विजयी मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याची प्रत्येकालाच उत्सुकता होती. हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी वरळीचा डोम तुडुंब भरला होता. बाहेरही स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. इतकेच काय, तर लोकल आणि घराघरांत हा सोहळा लाईव्ह पाहिला गेला.
वरळीच्या डोममध्ये आयोजित केलेल्या या विजयी मेळाव्याला सकाळपासूनच राज्याच्या विविध भागातून मराठीजन येत होते. सकाळी अकरा वाजण्याच्या पूर्वीच हॉल गर्दीने ओसंडून वाहत होता. ‘ठाकरे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘आवाज कोणाचा…’ अशा गगनभेदी घोषणा देत मराठीजन या मेळाव्यात सहभागी होत होते. या सोहळय़ाला प्रचंड गर्दी झाल्याने डोममध्ये मोठय़ा स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आगमनानंतर त्यांची छबी टिपण्यासाठी प्रत्येकजण मोबाईल घेऊन धडपडत होता. सकाळपासूनच विविध माध्यमांच्या चॅनल्सवर हा एकच इव्हेंट दाखवण्यात येत असल्याने केवळ मराठी घराघरातच नव्हे, तर ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा देशभरातील नागरिकांनी अनुभवला.
अनेक आबालवृद्ध मराठीजनांना या विजयोत्सवात सहभागी होता आले नाही. त्यामुळे त्यांनी टीव्ही तसेच मोबाईलवर लाईव्ह सोहळा अनुभवला. फेसबुक लाईव्ह, यूटय़ूब आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकल, बस, टॅक्सी, रिक्षासह घराघरात हा भव्यदिव्य सुखद सोहळा लाईव्ह पाहत होते. तसेच या अभूतपूर्व मेळाव्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत होते.