भारतीय कसोटी क्रिकेट संघाला इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. मात्र भारतीय फलंदाजांची उल्लेखनीय कामगिरी ही जमेची बाजू ठरली. भारतीय फलंदाजांनी दुसर्या सामन्यातही धावांचा पाऊस पाडला. मात्र भारतासाठी कसोटीत त्रिशतक करणारा करुण नायर स्वप्नवत कमबॅक करण्यात अपयशी ठरला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कडक कामगिरीच्या जोरावर निवड समितीने करुण नायरची इंग्लंड विरुद्धचा कसोटी मालिकेत निवड केली. मात्र करुणला पहिल्या 2 कसोटीतील 4 डावांत काही खास करता आलं नाही. त्यामुळे करुणच्या कसोटी कारकीर्दीतील इंग्लंड विरुद्धची मालिका शेवटची ठरणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
करुण नायरने देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक स्पर्धेत खोऱ्याने धावा केल्या. करुणने यासह निवड समितीला कमबॅकची संधी देण्यास भाग पाडलं. करुणचं तब्बल 8 वर्षांनंतर कमबॅक झालं. त्यामुळे करुण देशांतर्गत क्रिकेटप्रमाणे इंग्लंड विरुद्धही तशाच धावा करेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना होती. करुणला या 2 सामन्यांमधील काही डावात सुरुवात मिळाली. मात्र करुण मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे करुणला तिसऱ्या सामन्यातून डच्चू दिला जाऊ शकतो.
करुणला इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या स्थानी संधी मिळाली. साई सुदर्शनला दुसऱ्या सामन्यातून वगळण्यात आल्यानं करुणला तिसऱ्या स्थानी फलंदाजांसाठी यावं लागलं. करुण या संधीचा फायदा घेण्यात अपयशी ठरला. करुण 31 धावांवर आऊट झाला. तर करुणने दुसऱ्या डावातही निराशा केली. करुणने दुसऱ्या डावात 26 धावा केल्या. करुणला दोन्ही डावात चांगली सुरुवात मिळाली. मात्र करुण त्या खेळीला मोठ्या धावसंख्येत परावर्तीत करु शकला नाही.
करुण नायरने 2016 साली इंग्लंड विरुद्ध त्रिशतक ठोकलं होतं. मात्र त्यानंतर करुणला फार संधी मिळाली नाही. मात्र करुण आता संधी मिळाल्यानंतर निवड समितीला प्रभावित करण्यात यशस्वी होऊ शकला नाही. करुणने 2 सामन्यांमधील 4 डावांत 19.25 च्या सरासरीने 77 धावा केल्या. तर करुणची 31 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 10 जुलैपासून लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम मॅनजेमंट करुणला तिसऱ्या सामन्यात संधी देण्याबाबत काय निर्णय घेते? हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे करुणला आणखी संधी द्यायची की त्याच्या जागी दुसऱ्या फलंदाजाचा समावेश करायचा? याबाबत टीम मॅनेजमेंटकडून काय निर्णय घेतला जातो? हे लवकरच स्पष्ट होईल.