स्टॅलिन यांच्याकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक, पण ठाकरे गटाचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना धक्का, राऊत नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi July 07, 2025 01:45 AM

शनिवारी मुंबईत विजय मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूंची उपस्थिती होती. त्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मुंबईत पार पडलेल्या विजयी मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं कौतुक केलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदी संदर्भात घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो असं ट्विट एम. के स्टॅलिन यांनी केलं. दरम्यान त्यानंतर आता स्टॅलिन यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

आमचा विरोध हा हिंदीला नाही, तर प्राथमिक शाळेपासून जी हिंदी भाषा सक्ती करण्यात येणार होती तिला होता, असं शिवसेना ठाकरे गटानं म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे की, दक्षिणेकडील राज्य गेल्या अनेक वर्षांपासून या मुद्द्यावर लढत आहेत. हिंदी लादली जाण्याबाबत त्यांची भूमिका अशी आहे की, आम्ही हिंदी बोलणार नाही आणि कोणाला बोलू देखील देणार नाही. मात्र आमची भूमिका अशी नाही आहे, आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की प्राथमिक शाळेमध्ये पहिलीपासून जी हिंदीची सक्ती करण्यात येणार आहे, ती आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही हिंदी बोलतो. आमची लढाई फक्त शिक्षणात त्रिभाषेपूरतीच मर्यादीत आहे.

स्टॅलिन यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

स्टॅलिन यांनी शनिवारी झालेल्या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. हिंदी भाषा लादली जात आहे, त्याविरोधात द्रविड मुन्नेत्र कळघम आणि तामिळ जनतेचा वर्षानुवर्ष लढा सुरू आहे. आता हा लढा राज्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रातही पोहोचला आहे. हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये विजयी रॅली काढण्यात आली, या सभेतील भाषण आमचा उत्साह वाढवणारं होतं, मात्र त्यानंतर आता यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देताना मोठं वक्तव्य केलं आहे, आमचा हिंदीला विरोध नाही तर तिच्या शिक्षणातील सक्तिला विरोध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.