भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेची सुरुवात विजयाने करण्यात अपयश आलं. भारताकडून लीड्समध्ये झालेल्या या सामन्यात 4 फलंदाजांनी 5 शतकं केली. त्यानंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने पाचव्या दिवसातील शेवटच्या तासात विजय मिळवला. इंग्लंडने 371 धावांचं आव्हान पूर्ण केलं आणि विजयी सलामी दिली. त्यामुळे भारतासमोर दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचं आव्हान होतं. तसेच भारताने याआधी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बर्मिंगहॅममध्ये विजय मिळवला नव्हता. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीत खेळणार नव्हता. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल आणि टीम इंडियासमोर दुसर्या कसोटीत असंख्य आव्हानं होती. मात्र शुबमनसेना या आव्हानांना पुरुन उरली आणि बर्मिंगहॅममध्ये इतिहास घडवला.
भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या आणि अंतिम दिवशी 6 जुलै रोजी इंग्लंडचा 336 धावांनी धुव्वा उडवला. भारताने इंग्लंडला 608 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. भारताने इंग्लंडला 271 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. कर्णधार शुबमन गिल याच्या नेतृत्वातील भारताचा हा पहिलावहिला विजय ठरला. कर्णधार शुबमनने या ऐतिहासिक विजयासह मोठा कीर्तीमान आपल्या नावावर केला.
शुबमन भारताला कसोटीत बर्मिंगहॅममध्ये विजय मिळवून देणारा पहिला कर्णधार ठरला. याआधी भारताचं कपिल देव, सुनील गावसकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि अनेक दिग्गज कर्णधारांनी नेतृत्व केलं. मात्र याआधी एकाही कर्णधाराला भारताला बर्मिंगहॅममध्ये विजयी करता आलं नव्हतं. मात्र शुबमनने त्याच्या नेतृत्वात हा कारनामा करुन दाखवला.
गिलचा मोठा कारनामा
भारताचा बर्मिंगहॅममधील हा नववा कसोटी सामना होता. भारताने याआधी या मैदानात 8 सामने खेळले होते. मात्र त्यापैकी एकाही सामन्यात भारताला विजय मिळवता आला नव्हता. भारताला 8 पैकी 7 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तर भारताला 1 सामना अनिर्णित राखण्यात यश आलं होतं. मात्र आता कर्णधार शुबमनने भारताला विजयी करुन बर्मिंगहॅममधील इतिहास बदलला.