रविवारी (६ जुलै) भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडला दुसऱ्या कसोटी सामन्यात ३३६ धावांनी विजय मिळवला. ऍजबॅस्टनमध्ये झालेल्या या सामन्यातील विजयासह भारताने ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
तसेच ऍजबॅस्टनमध्ये भारताचा हा इतिहासातील पहिलाच कसोटी विजय ठरला आहे. भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात वेगवान गोलंदाज आकाश दीपचाही मोठा वाटा राहिला.
ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Videoआकाश दीपने या सामन्यात पहिल्या डावात २० षटकात ६६ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. तसेच दुसऱ्या डावात त्याने २१.१ षटकात ९९ धावा खर्च करत ६ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने एकूण ४१.१ षटके गोलंदाजी करताना १८७ धावा देत १० विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
ही इंग्लंडमध्ये भारतीय गोलंदाजाने केलेली कसोटी सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी हा विक्रम चेतन शर्मा यांच्या नावावर होता. त्यांनी ऍजबॅस्टनमध्येच १९८६ साली १८८ धावांत १० विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान, आकाश दीपसाठी ही कामगिरी भावनिकही ठरली. त्याला इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. पण दुसऱ्या सामन्यात त्याला जसप्रीत बुमराहच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानेही ही संधी दोन्ही हातांनी पकडली आणि १० विकेट्स घेत हा विक्रम केला.
परंतु, या सामन्यानंतर आकाश दीपने सांगितलं की ही कामगिरी तो त्याच्या बहिणीला समर्पित करत आहे. त्याने चेतेश्वर पुजाराशी बोलताना भावूक होत सांगितले की दोन महिन्यांपूर्वी त्याच्या मोठ्या बहिणीला कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे.
तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. पण गेल्या दोन महिन्यांपासून ती ज्या त्रासातून गेली, त्यानंतर त्याच्या या कामगिरीने तिला थोडा आनंद मिळाला असेल. त्यामुळे हा सामना तिला समर्पित करत असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, त्याच्या डोक्यात नेहमीच तिचा विचार होता.
ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताकाया सामन्यात भारताने पहिल्या डावात १५१ षटकात सर्वबाद ५८७ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात ८९.३ षटकात सर्वबाद ४०७ धावा केल्या. त्यामुळे भारताला १८० धावांची आघाडी मिळाली होती.
या आघाडीसह दुसरा डाव भारताने ८३ षटकात ६ बाद ४२७ धावांवर घोषित केला आणि इंग्लंडसमोर ६०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव ६८.१ षटकात २७१ धावांवर संपुष्टात आला.