रेल्वेने १ जुलैपासून तत्काळ आरक्षण प्रणालीत बदल केला. तत्काळ आरक्षणसाठी आधार प्रमाणीकरण सक्तीचे केले. तसेच रेल्वे एजंटांना तत्काळ आरक्षण खिडकी सुरु झाल्यावर अर्ध्या तासानंतर आरक्षणाच करता येणार आहे. या नियमामुळे आरक्षण मिळण्यासाठी प्रवाशांना फायदा होणार आहे. आता रेल्वेने आणखी एक सुधारणा आरक्षण प्रणालीत केली आहे. त्याचा फायदा वेटींग तिकीट (प्रतिक्षा यादी) असलेल्या प्रवाशांना मिळणार आहे. रेल्वेने येत्या १० जुलैपासून आरक्षण चार्ट हा आठ तास आधीच तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी चार तास आधी आरक्षण चार्ट तयार होत होता.
यापूर्वी असा होता नियमरेल्वे बोर्डाच्या नवीन नियमानुसार, सर्व झोनमध्ये आरक्षण चार्ट १० जुलैपासून आठ तास आधी होणार आहे. यामुळे प्रतिक्षा यादीत तिकीट असणाऱ्या प्रवाशांना तुमचे तिकीट आरक्षित झाले की नाही हे आठ तास आधीच समजणार आहे. त्यापूर्वी प्रवाशांना चार तास आधी तिकीट आरक्षण झाले की नाही, समजत होते. त्यामुळे तिकीट आरक्षित न झाल्यास प्रवाशांना ऐनवेळी पर्यायी प्रवास करण्याचा पर्याय शोधावा लागत होता. परंतु आता आठ तास आधी तिकीट आरक्षण समजणार असल्यामुळे प्रवाशांना वेळ मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या झोनमध्ये १० तारखेपासून या प्रणालीची सुरुवात होणार आहे.
आता असा होणार चार्ट तयारसुधारित चार्टच्या वेळापत्रकानुसार, ज्या गाड्या पहाटे ५ ते दुपारी २ दरम्यान धावतात, त्या गाड्यांचा चार्ट आदल्या दिवशी रात्री ९ वाजेपर्यंत तयार होणार आहे. तसेच ज्या गाड्या दुपारी २ ते रात्री ११.५९ पर्यंत दरम्यान धावतात त्यांचा चार्ट गाडी निघण्याच्या आठ तास आधी तयार आहे. रात्री १२ ते पहाटे ५ दरम्यान धावणाऱ्या गाड्यांचा चार्टसुद्धा गाडी निघण्याच्या आठ तासांपूर्वी तयार होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना फायदा होणार आहे.
काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली एका बैठक झाली होती. त्या बैठकीत आरक्षण चार्ट आठ तास आधी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याचे आदेश रेल्वेने सर्व विभागांना दिले आहे.