शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने बर्मिंगहॅममधील एजबेस्टनमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 336 धावांनी मात केली. भारताने यासह अँडरसन-तेंडुलकर टेस्ट सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी केली. आता उभयसंघातील तिसरा सामना 10 जुलैपासून लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याआधी शुबमनने एका शब्दात उत्तर देत खळबळ उडवून दिली आहे. तिसर्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं बुमराहने दुसऱ्या कसोटीनंतर सांगितलं.
लॉर्ड्स टेस्टसाठी ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह याचं कमबॅक होणार असल्याचं शुबमन गिल याने दुसऱ्या सामन्यानंततर सांगितलं. त्यामुळे बुमराहसाठी कुणाला बाहेर केलं जाणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे दुसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे बुमराहच्या जागी आकाश दीप याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली.
बुमराह तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही? असा प्रश्न शुबमनला करण्यात पोस्ट मॅच प्रेजेंटेशन दरम्यान करण्यात आला. बुमराहने तेव्हा क्षणाचा विलंब न लावता “निश्चित”, असं म्हटलं. तसेच शुबमनने बुमराह तिसऱ्या सामन्यात खेळणार असल्याचा पुनरुच्चार पत्रकार परिषदेतही केला. त्यामुळे आता बुमराहसाठी कॅप्टन गिल कुणाला बाहेर बसवण्याचा निर्णय करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
बुमराहने इंग्लंड दौऱ्याआधी वर्कलोड मॅनेजमेंटमुळे 5 पैकी 3 सामन्यात खेळणार असल्याचं बीसीसीआयला कळवलं होतं. तसेच याबाबतची माहिती निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर करताना पत्रकार परिषदेतही दिली होती. त्यानुसार बुमराह पहिल्या सामन्यात खेळला. मात्र दुसर्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे बुमराहच्या जागी आकाश दीप याला संधी मिळाली.
आकाशने या संधीचा फायदा घेत सोनं केलं. आकाशने पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेतल्या. आकाशने यासह पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 विकेट्स घेण्यासह एका सामन्यात 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यामुळे आता आकाशला संघातून बाहेर करण्याचा निर्णय धाडसी ठरु शकतो. त्यामुळे प्रसिध कृष्णा याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
प्रसिध कृष्णाला इंग्लंड विरूद्धच्या दोन्ही सामन्यात संधी देण्यात आली. मात्र प्रसिध आपली छाप सोडण्यात निष्प्रभ ठरला. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या कमबॅकनंतर प्रसिधला डच्चू मिळण्याची अधिक संधी आहे.मात्र आता टीम मॅनेजमेंट याबाबत अंतिम निर्णय काय घेते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.