वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025 चा किताब जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेने केशव महाराज याच्या नेतृत्वात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली. मात्र केशवला दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे केशवच्या जागी वियान मुल्डर याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. वियानने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात विक्रमी कामिगरी केली. वियानने क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो इथे खेळवण्यात येत असलेल्या दुसऱ्या कसोटीतील दुसर्या दिवशी ऐतिहासिक त्रिशतक झळकावत अनेक दिग्ग्जांना मागे टाकलं आहे.
वियानने कसोटी कारकीर्दीतील 21 व्या सामन्यात त्रिशतक ठोकण्याचा कारनामा केला. वियान त्रिशतक करणारा पहिला कर्णधार तर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फलंदाज ठरला. वियानआधी कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी करता आली नव्हती. तसेच वियानआधी दक्षिण आफ्रिकेसाठी माजी दिग्गज फलंदाज हाशिम आमला याने त्रिशतक केलं होतं. वियानने त्रिशतकानंतर 12 धावा जोडल्या एक रेकॉर्ड ब्रेक केला. वियानने हाशिम आमलाला मागे टाकत कसोटीत दक्षिण आफ्रिकेसाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला. हाशिम आमला याने टेस्टमध्ये एका इनिंगमध्ये 311 रन्स केल्या होत्या.
वियानने 101.01 च्या स्ट्राईक रेटने 297 बॉलमध्ये 300 रन्स केल्या. वियानने या खेळीत 38 चौकार आणि 3 षटकार ठोकले. वियान यासह वेगवान त्रिशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. वेगवान त्रिशतक करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या नावावर आहे. सेहवागने 278 बॉलमध्ये चेन्नईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही कामगिरी केली होती.
वियानने या त्रिशतकी खेळीदरम्यान 240 धावा करताच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. वियान कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला. वियानने याबाबतीत न्यूझीलंडच्या ग्राहम डाउलिंग यांचा रेकॉर्ड ब्रेक केला. ग्राहम यांनी 1968 साली ख्राईस्टचर्चमध्ये टीम इंडिया विरुद्ध कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात 519 चेंडूत 239 धावा केल्या होत्या.