बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जण अंधश्रद्धेचे बळी ठरले आहेत. एका महिलेवर चेटकीण असल्याचा आरोप करत गावातील काही जणांनी हल्ला करून या महिलेसह तिच्या कुटुंबातील पाच जणांना जीवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
ही घटना बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातल्या मुफस्सिल पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या टेटगामा परिसरात घडली आहे. गावातील एक महिला चेटकीण असल्याचा संशय येथील ग्रामस्थांना होता, यातूनच ही खळबळजनक घटना घडली आहे. आधी या कुटुंबावर हल्ला करण्यात आला, त्यांना जबर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना जीवंत पेटून देण्यात आलं, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार याच गावात राहाणारी सीता देवी (48 वर्ष) ही महिला चेटकीण असल्याचा संशय गावातील लोकांना होता. त्यानंतर रविवारी गावचा प्रमुख असलेल्या नकुल उरांव यांच्या उपस्थितीमध्ये गावात एक बैठक बोलावण्यत आली, या बैठकीला दोनशे पेक्षा अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीसाठी सीता देवी त्यांचे पती बाबूलाल उरांव, सासू कांतो देवी, मुलगा मंजीत उरांव आणि सून रानी देवी यांना देखील बोलावण्यात आलं.
त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी काठ्यांनी या कुटुंबाला बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या या कुटुंबाला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्यात आलं. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा मंजीत उरांव हा या जमावाच्या तावडीतून निसटल्यानं थोडक्यात बचावला आहे, त्याने या घटनेची माहिती पोलिसांनी दिली, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. दोन मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत, तिन मृतदेहांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत गावच्या प्रमुखाला आणि ट्रॅक्टर चालकाला अटक करण्यात आली आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.