बीडमधील गुन्हेगारीच्या घटना थांबायला तयार नाहीत. आता केज तालुक्यातील एका गावात 9 वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी तरुण निखिल कांबळेने पीडित तरुणीचा पाठलाग करत तिला, ‘तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी आत्महत्या करीन, तुझ्या आई-वडिलांनाही मारीन, अशी धमकी देत विनयभंग केला. त्यानंतर आता निखिल कांबळेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन शाळकरी मुलीचा मागील 15 दिवसांपासून आरोपी तरुणाकडून दुचाकीवरून पाठलाग सुरू होता. मुलीकडून उत्तर न मिळाल्याने निखिल कांबळेने 4 जुलै रोजी मुलीला धमकी दिली. यानंतर मुलीच्या घरचे त्याला जाब विचारण्यासाठी गेले असता, त्याने एका महिलेला देखील त्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता केज पोलीस ठाण्यात त्याच्याविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठ दिवसातील केज पोलीस ठाणे हद्दीतील महिला अत्याचाराची ही तिसरी घटना आहे. वाल्मीक कराडचा समर्थक असलेल्या नानासाहेब चौरेने गतिमंद मुलीवर बलात्कार केला होता. तर बाळू कांबळेने गतिमंद तरुणीचा विनयभंग केला होता. यानंतर आता बाळू कांबळेचा मुलगा निखिल कांबळेने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे.
धक्कादायक म्हणजे विनयभंग प्रकरणातील आरोपी निखिल कांबळेचे वडील बाळासाहेब कांबळे याच्या विरोधात देखील 2 दिवसांपूर्वी एका गतिमंद तरुणीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. आता मुलावरही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आरोपींना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे समोर आले आहे.