पहलगाम हल्लानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची ९ तळ उद्ध्वस्त केली. त्या ऑपरेशन दरम्यान भारताचे राफेल विमान पाडल्याचा दावा पाकिस्तानकडून सातत्याने करण्यात येत होते. परंतु भारताकडून हा दावा फेटळण्यात येत होता. आता राफेल विमान बनवणाऱ्या कंपनीने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानची पोलखोल झाली आहे.
माध्यमामधील वृत्तानुसार, फ्रान्समधील डसॉल्ट एव्हिएशनचे अध्यक्ष आणि सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी म्हटले की, भारताचे एक राफेल जेट उंचीवर जाऊन तांत्रिक बिघाडामुळे क्रॅश झाले. परंतु पाकिस्तानकडून एकही राफेल विमान पाडण्यात आले नाही. भारताच्या एका राफेल विमानाचे नुकसान झाले. परंतु राफेल विमानाचे नुकसान पाकिस्तामुळे झाले नाही तर तांत्रिक कारणामुळे झाले आहे. पाकिस्तान सातत्याने दावा करत होते की, पाकिस्तानच्या J-10C फायटर जेटने PL-15E एअर टू एअर क्षेपणास्त्र हल्ला करत भारताचे विमान पाडले. परंतु त्यासंदर्भातील एकही पुरावा पाकिस्तान देऊ शकला नाही.
फ्रान्समधील अधिकाऱ्याने म्हटले की, राफेल विमान कसे पडले? त्याची चौकशी केली जात आहे. फ्रान्सने आठ देशांना हे विमान विकले आहे. परंतु कुठेही राफेलचे नुकसान झाले नाही. यापूर्वी सीएनबीसीसोबत बोलताना संरक्षण सचिव आर.के.सिंह म्हणाले होते की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताचे विमान पाडले हा पाकिस्तानचा दावा चुकीचा आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याला पूर्ण अधिकार देण्यात आले होते. त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नव्हता.
भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या संघर्षा दरम्यान मे महिन्यात चीनकडून संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करण्यात आले होते. फ्रान्समध्ये निर्मिती करण्यात आलेल्या राफेल विमानाच्या प्रदर्शनाबाबत संभ्रम निर्माण करण्यात आला. त्यामुळे विमानाची प्रतिष्ठा आणि विक्रीसाठी नुकसान होईल, या पद्धतीने चीनकडून माहिती दिली गेली. फ्रान्स सैन्य आणि गुप्तचर संघटनाच्या अधिकाऱ्यांनी हा निष्कर्ष काढला होता.