छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दिला जाणारा मोफत गणवेश म्हणजे शासनाचा सामाजिक न्याय व शैक्षणिक संधीतील समतेचा एक भाग आहे. मात्र या उपक्रमाला भ्रष्टाचाराची लागण झाल्याचे धक्कादायक वास्तव छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आले आहे. पैठण तालुक्यातील मौजे वडजी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने सरपंचाच्या नावे थेट गणवेश पुरवठादाराकडे १५ हजार रुपये कमिशनची मागणी केल्याचा आरोप समोर आला आहे. याबाबतची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठा केला जात असतो. मात्र या गणवेश प्रकरणात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात झालेल्या सदर प्रकरणात संबंधित शिक्षकाने एका शाळेसाठी गणवेश पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्याशी संपर्क साधला. यात प्रत्येक गणवेशामागे ठराविक रक्कम ‘कमिशन’ म्हणून मागितल्याचा उल्लेख या क्लिपमध्ये स्पष्टपणे ऐकू येतो. इतकेच नव्हे तर सरपंचाच्या नावे हे पैसे देण्याची सूचना करत सर्व सहकार्य करतो, पण साईडला पाहिजेच अशा स्वरूपाची भाषा त्यात वापरण्यात आली आहे.
Saam Impact : दोन पुलांच्या उभारणीसह ६ किमीचा रस्ता; साम टीव्हीच्या बातमीनंतर बांधकाम विभागाकडून मोजणीविद्यार्थ्यांना अद्याप गणवेश नाही
दरम्यान या प्रकारामुळे शैक्षणिक व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाचे उद्दिष्ट असताना त्यात भ्रष्टाचार होत असल्याने या योजनेचा मूळ हेतू हरवत असल्याची प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना अद्याप पूर्ण गणवेशही मिळाले नसताना शिक्षक आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या नावाने पैसे मागितले जात असल्याची चर्चा गावात सुरू झाली आहे.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
सदर प्रकरणाची चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करावी; अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या प्रकारामुळे संपूर्ण शिक्षक समाज संतप्त झाला आहे. सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली नाही; तर यापुढे शासकीय योजना राबवताना जनतेचा विश्वास उरणार नाही, अशी नाराजी पालकांमध्ये आहे. शिक्षण विभागाने तातडीने याची दखल घेऊन पारदर्शकता सुनिश्चित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.