देशी अटॅग्स भारतीय सैन्याची शक्ती वाढवतील
Marathi July 08, 2025 11:25 PM

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय सैन्याची शक्ती वाढविण्यासाठी पूर्णपणे देशात विकसित करण्यात आलेली आधुनिक तोफ अॅडव्हान्स्ड टोड आर्टिलरी गन सिस्टीम (एटीएजीएस) आता तयार आहे. या तोफेला डीआरडीओने पुण्यातील एआरडीईसोबत मिळून तसेच खासगी कंपन्यांच्या सहकार्याने विकसित केले आहे.

एटीएजीएस  ही जगातील सर्वोत्तम तोफ प्रणालींपैकी एक आहे. ही 155 मिमी/52 कॅलिबरची तोफ असून याचा कमाल मारक पल्ला 48 किलोमीटर इतका मोठा आहे. यात 25 बॉम्बची क्षमता असलेला बॅरल असून हे झोन 7 मध्ये फायर करू शकते. सध्या यासाठी वापरण्यात येणारा दारूगोळा अनगायडेड आहे, परंतु आम्ही गायडेड म्हणजेच अचूक लक्ष्य भेदणारे गोळे विकसित करण्यावरही काम करत आहोत, अशी माहिती एआरडीईचे संचालक ए. राजू यांनी दिली आहे. भारतीय सैन्याने मार्च महिन्यात 307 एटीएजीएस तोफांची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरला भारत फोर्ज आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीमदरम्यान 60:40 या प्रमाणात विभागण्यात आले आहे. म्हणजेच 60 टक्के तोफा भारत फोर्ज निर्माण करणार आहे. तर 40 टक्के तोफा टाटा कंपनीकडून तयार करण्यात येतील. या सर्व तोफा 5 वर्षांच्या कालावधीत सैन्याला सोपविण्यात येणार आहेत.

डीआरडीओ-कंपन्यांचे संयुक्त प्रयत्न

ही तोफ डीआरडीओ आणि खासगी कंपन्यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आली आहे. याची फायरिंग क्षमता झोन 7 मध्ये आहे, यामुळे ही 48 किलोमीटरपर्यंत लक्ष्याचा वेध घेऊ शकते. ही पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानावर आधारित असून 75 टक्क्यांपर्यंतचे सुटे भाग देशातच निर्माण करण्यात आल्याचे एटीएजीएस प्रकल्पाचे संचालक आर. पी. पांडे यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.