शाळेतच मिळणार भाजीपाल्यांची बियाणे
esakal July 08, 2025 11:45 PM

पुणे, ता. ८ : विद्यार्थ्यांमध्ये भाजीपाल्याची गोडी निर्माण होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेला भाजीपाल्यांच्या बियाण्यांचे किट दिले जाणार आहे. यामध्ये १२ प्रकारच्या भाज्यांची बियाणे देण्यात येणार असून, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक शिक्षणासाठी ही होणार आहे.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेकडून ३०३ शाळांमध्ये मॉडेल स्कूलमध्ये भाजीपाल्यांची बियाणे दिले जाणार आहे. यामध्ये १२ प्रकारच्या भाज्यांच्या एकूण १९ वाणांचे बियाणे देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबतच जीवनोपयोगी कौशल्ये आत्मसात करता यावीत, या हेतूने प्रशासनाकडून हा उपक्रम सुरू केला आहे.
बियाण्यांची ओळख, बियाण्यांपासून अंकुर येणे, त्यांची वाढ, योग्य पाणी व खत व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि शेवटी उत्पादन मिळाल्यावर ते स्वतःच्या हाताने काढण्याचा अनुभव हे सर्व शिकवले जाणार आहे. त्यामुळे बियाण्यांपासून पीक तयार होण्याची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शाळेतील विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळणार आहे. शाळेच्या आवारातच छोटी परसबाग उभारून या बियाण्यांची लागवड केली जाणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाशी संवाद, प्रयोगशीलता, निरीक्षणशक्ती आणि स्वतःच्या मेहनतीने काहीतरी निर्माण करण्याचा आत्मविश्वास विकसित होणार आहे. शालेय शिक्षणासह कृषी क्षेत्राची प्राथमिक ओळख, शाश्वत शेतीची संकल्पना, तसेच पर्यावरणपूरक दृष्टिकोन यामध्येही या उपक्रमामुळे विद्यार्थी सक्षम होतील. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता, त्यांचे ज्ञान समृद्ध होत असून, भविष्यातील उद्योजक, पर्यावरणप्रेमी व नवदृष्टीचे शेतकरी म्हणून त्यांची जडणघडण होईल.
- अजित पिसाळ, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.


विद्यार्थ्यांना याची माहिती मिळणार
- भाजीपाल्यांची बियांची ओळख.
- शिक्षकांच्या मदतीने परसबागेत भाज्यांची लागवड होणार.
- तालुका स्तरीय कृषी विभागाकडून शिक्षक, विद्यार्थ्यांना आवश्यक तेव्हा मार्गदर्शन.
- विद्यार्थ्यांना पिकांची रचना समजण्यासाठी याचा फायदा .
- भाज्यांचे पीक घेताना त्याच्या वाढीची प्रक्रिया.
- पिकांवर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव, त्याचे नियंत्रण.
- १२ भाजीपाल्यांचे बियाणे.
- १९ वाणांचे किट.
- ३०३ शाळांमध्ये होणार वाटप.

या भाजीपाल्यांची बियाणे दिली जाणार
भेंडी, चवळी, मटार, कांदा, पावटा, कोथिंबीर, दोडका, ढेमसे, मुळा, वांगी, कारले, घोसाळे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.