मुंबई - ‘राज्यघटनेमुळे देशातील वंचित घटकाला न्याय दिला आहे. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती आहेत. त्यांना हा मान बाबासाहेबांच्या घटनेमुळे मिळाला आहे. बाबासाहेबांच्या घटनेमुळे शेवटच्या घटकाला समानता, हक्क, न्याय मिळत आहे. शांततेच्या काळात किंवा कोणत्याही परिस्थितीत देशाला ही घटना एकसंध बांधून ठेवेल,’ असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.
महाराष्ट्राच्या विधिमंडळात मंगळवारी सरन्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला. विधिमंडळ, न्यायपालिका आणि संसद हे स्तंभ देशाचे आधारस्तंभ आहेत, असे सांगत गवई यांनी भारतीय राज्यघटनेविषयी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाविषयी सभागृहाला माहिती दिली.
‘मला हे पद देशाची व समाजाची सेवा करण्यासाठी दिलेली संधी आहे असे समजतो. तसेच विधिमंडळाने केलेला सत्कार माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. भारतीय राज्यघटना या विषयावर सरन्यायाधीशांनी विधिमंडळाच्या दोन्ही सदस्यांपुढे प्रबोधनपर भाषण केले.
विधानपरिषद आणि विधानसभेचे सदस्य, विधानसभेचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यातील साधेपणा हा गुण घेण्यासारखा आहे. त्यांचे वडील दादासाहेब गवई यांची बुद्धिवान होते. त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते. तोच गुण गवई यांनी घेतला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘आजचा सत्कार हा इतिहासात नोंद होईल, असा आहे. महाराष्ट्रातील विधिमंडळात त्यांचा सत्कार होत आहे. सरन्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल मी भूषण गवई यांचे अभिनंदन करतो.’
निपक्ष सरन्यायाधीश
‘अस्सल हिरा कुठेही चकाकतोच.. निपक्ष सरन्यायाधीश देशाला मिळाले हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. शिका, संघटित व्हा आणि शासनकर्ती जमात बना हा मूलमंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. सरन्यायाधीश गवई यांनी हा मंत्र जिवापाड जपला आणि खरा करून दाखवला,’ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.