- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
एक वडील आपल्या मुलाला रोज पोहायला शिकायला म्हणून स्वीमिंग पूलवर घेऊन जायचे. सुरुवातीला ते मूल खूप घाबरायचे. वास्तविक तेथील प्रशिक्षक फार छान आणि पद्धतशीर शिकवायचे. परंतु उपजत भीती बालकाच्या मनात असते की काय कुणास ठाऊक? ते बालक रांगेत उभे राहायचे, पण त्याचा नंबर आला की पळून जायचे किंवा लपून बसायचे.
मग प्रशिक्षकाने एक दिवस उचलून पाण्यात टाकले. एखादी डुबकी खाल्ली असेल त्या मुलाने. परंतु जिवाच्या आकांताने, त्याने हातपाय मारले आणि तरला. पोहायला शिकला. नंतर सावकाशीने अत्यंत तालबद्ध आणि लयीत, ते मुल वेगवेगळ्या प्रकाराने पोहायला शिकले.
एक दिवस प्रशिक्षकाने त्याला डायव्हिंग टॉवरवरून उडी मारायला सांगितले. ते बालक अत्यंत आत्मविश्वासाने थेट वरच्या मजल्यावर गेले. आता मात्र तिथे आत्तापर्यंत, इतके दिवस फक्त बघ्याची भूमिका घेणाऱ्या त्या बालकाच्या वडिलांच्याच मनात भीतीने अविश्वास निर्माण झाला आणि न राहवून ते बाबा उद्गारले, ‘‘तुला जमेल ना रे?’’
तोपर्यंत त्या मुलाने उडी मारली होती. उडी मारता मारता त्याच्या कानात वडिलांचे शब्द पडले आणि तो मुलगा धाडकन पोटावर पडला. त्याला प्रशिक्षकाच्या मदतीने बाहेर काढावे लागले. पोट लालबुंद झाले होते. प्रचंड वेदना त्या लेकराच्या चेहऱ्यावरून जाणवत होती.
असे काही प्रसंग घडले किंवा आठवले की, कवी शेल सिल्व्हरस्टेईनच्या ओळी आठवतात. त्या अशा ‘स्वतःच्या क्षमतांबद्दल शंका उत्पन्न करणारी वाक्ये एकतर स्वतःशी बोलू नकोस किंवा कुणीही उच्चारले तर त्यावर विश्वास ठेवू नको. फक्त सकारात्मक विचार कर, आत्मविश्वास ढळू देऊ नको. काहीही घडू शकते. अगदी चमत्कारही!’
मोठ्यांना विनंती, ‘तुला शक्य आहे का?’ अशी अवसानघातकी वाक्ये कृपया आपापल्या पाल्यांच्याच काय कुणाही व्यक्तीला उद्देशून उच्चारू नका. वेळप्रसंगी आपला बाप पहाडासारखा आपल्या पाठीशी उभा राहील, एवढा आत्मविश्वास, आपल्या मुलाला आपल्याबद्दल वाटला पाहिजे. कोणत्याही मुलाच्या मनात आपल्या वडिलांची प्रतिमा एखाद्या नायकाची असते.
आमच्या आजोबांविषयी वडील अजूनही एक गोष्ट सांगतात. काळ्या किट्ट रात्री आमचे आजोबा, त्यांना फक्त एक कंदील आणि काठी घेऊन शेताकडे पिटाळायचे. अंधाराची भीती घालवण्यासाठी. ही साधारण ८० वर्षांपूर्वीची घटना असेल. अर्थात आमचे आजोबा नकळत मागे-मागे जायचे. परंतु हे आमच्या वडिलांच्या फार उशिरा लक्षात आले. तो काळ ही वेगळा होता.
आज समृद्ध पालकत्वाचे निकष पण बदलले आहेत. तेव्हाचे पालक तसे वागले. आजच्या पालकांना त्यांच्या पाल्यांबाबत उपरोक्त उल्लेखिलेल्या उदाहरणांवरून आजच्या काळाला अनुसरून, जरा हटके उपाय योजावे लागतील याची कल्पना आहे. तारतम्य, विवेक महत्त्वाचा आहेच.