संजय गायकवाड सारख्या माजखोर आमदारांची मस्ती याच अधिवेशनात उतरवणं गरजेचं आहे, असं आक्रमक भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली आहे. मिंधेंचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “संजय गायकवाड यांनी ज्याप्रकारे बुक्केबाजी, मारहाण केली आहे, भ्रष्टनाथ मिंधे यावर काही बोलणार आहेत का? राष्ट्रीय चॅनलवर हे चालणार आहे का? भाजपसोबत ते युतीमध्ये आहेत, म्हणून ते शांत राहणार आहेत का? हे पाहण्या सारखं आहे. आम्ही विधानपरिषदेत गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. आमची ही मागणी आहे की, अशा मस्तीखोर, माजखोर आमदारांची मस्ती याच अधिवेशनात उतरवणं गरजेचं आहे.”
गिरणी कामगार आणि शिक्षकांच्या मोर्च्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आम्ही शिक्षक आणि गिरणी कामगारांच्या मोर्च्यात गेलो होतो. एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रात एक असंतोष सगळीकडेच पाहायला मिळत आहे. यात हा प्रश्न येतो की, ऐवढा असंतोष असताना, हे जे सरकार निवडून आलं आहे, ते लोकांना भेटायला किंवा त्यांचं ऐकून घ्यायला तयार नाही, त्यांच्या मागण्याही पूर्ण करण्यास तयार नाही. या सरकारने अनेक लोकांना फसवलं असून हे सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानेच जिंकून आलं आहे, लोकांच्या आशीर्वादाने नाही, हे आता स्पष्ट होत चाललं आहे. पण यात एक महत्त्वाची गोष्ट ही देखील आहे की, 200 आमदार असलेलं हे सरकार असेल, तीन पक्षांचं असेल, तर मग महाराष्ट्रातील लोकांचं, ज्यात शिक्षक, गिरणी कामगार, महिला, आणि शेतकरी आहे, यांचं ऐकायला का तयार नाहीत? नेमकं तुम्ही कामं कोणाची करताय? आज 57 हजार कोटींचं सप्लिमेण्ट्री बजेट मांडलं आणि प्रारित केलं. ही नक्की कामं कोणाची आहेत? हा फंड कोणाला जात आहे? हा प्रश्न प्रत्येकाच्या कामांना उपस्थित झाला आहे.”
मराठी मोर्च्याला परवानगी नाकारणाऱ्या मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची आज तातडीने बदली करण्यात आली. यावर आपली प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “काल मराठी माणसांची ताकद दिसली. काल एका लहान मुलाला घोड्यावरून उतरवलं, त्याला सांगण्यात आलं, तुलाही आत टाकेन आणि घोड्यालाही आत टाकेन. ही कुठली मस्ती आहे? या राज्यात अशी मस्ती दाखवत असतील तर, त्यांचं निलंबन करणं गरजेचं आहे.”
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महायुती सरकारवर आरोप केला आहे की, हे सरकार मतांची चोरी करून सत्तेत आलं. याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “हे 100 टक्के खरं आहे. मतांची चोरी, पक्षाची चोरी, पक्षाच्या चिन्हाची चोरी, आमदारांची चोरी, हे चोरांचं सरकार आहे.