भाषा कौशल्य!
esakal July 09, 2025 12:45 PM

- मृदुला अडावदकर, सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ

आजकाल जिकडे पाहावं तिकडे विवेक हरवलेली माणसे सहजपणे हिंसेचा आधार घेताना दिसतात. असं वाटतं की बोलून, संवाद साधून आपलं म्हणणं पटवून देण्याचा मार्ग अशा व्यक्ती का स्वीकारू शकत नाहीत? यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे लहानपणापासूनच भाषिक विकास नीट झालेला नसणं.

पुरेसा शब्दसंग्रह नसला, की योग्य त्या चपखल शब्दांत मनातल्या भावना ओळखता येत नाहीत आणि व्यक्तही करता येत नाहीत. मग मनाचा कोंडमारा होतो, आणि भावनांचा उद्रेक! असे प्रकार सतत घडू लागले की मग त्या व्यक्तीचं सामाजिक जीवनच विस्कटून जातं.

निरोगी नाती जोडता येणं, ती नाती जपता येणं हे मनाच्या आणि पर्यायाने समाजाच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे, नाही का? त्यासाठी भाषिक विकास चांगला झाला पाहिजे. भाषा कोणतीही असो तिचा उपयोग प्रत्येक क्षेत्रात नीटपणे करण्याचं कौशल्य असलेली माणसं घडली पाहिजेत.

शाळा-महाविद्यालयात कधीही पैकीच्या पैकी मार्क मिळू न देणारे विषय म्हणून भाषा विषय हे विद्यार्थी जगतात फार प्रिय नसतात. भाषा म्हणजे ‘स्कोअरिंगचा नसलेला’ विषय असतो. याला अपवाद संस्कृतचा!

त्यातून शिकविणारे शिक्षक रसाळ असतील तर ठीक, नाहीतर मग व्याकरण, शुद्धाशुद्ध नियम या सगळ्यात भाषा शिकण्याचा आनंदही शिल्लक रहात नाही. एकंदर त्यातली मजाच हरवते.

व्यावहारिक जगात मात्र भाषेला, बोलण्याच्या पद्धतीला महत्त्व आहे.

परदेशात कोणत्याही शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जाताना भाषेची विशिष्ट पातळीची संपादणूक आहे ना यासाठी IELTS किंवा तत्सम परीक्षांचे गुण विचारात घेतात. तारतम्य ठेवून स्वतःच्या खास शैलीत बोलणाऱ्या, इ-मेल लिहू शकणाऱ्या आणि प्रभावी सादरीकरण करू शकणाऱ्या व्यक्ती सामाजिक आणि व्यावसायिक यश आपल्याच खिशात घालून नेतात ते काय उगाच?

माध्यम, शिक्षण आणि जाहिरात क्षेत्रात जायचं असेल तरच फक्त भाषा चांगली यायला हवी असा एक समज होता. आता तो पूर्ण पुसून गेलेला आहे कारण संगणकाचा वापर सुरू झाल्यानंतर भाषिक कौशल्ये सर्वच क्षेत्रात अप्रत्यक्षरीत्या महत्त्वाची ठरताहेत.

त्यासाठी शालेय वयापासून भाषेचा नीट अभ्यास करायला हवा. नियमित लिहिण्या-वाचण्याच्या काही चांगल्या सवयी आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरतात. उदा. आजच्या दिवसभरात घडलेली चांगली -वाईट- विशेष घटना रोज झोपण्यापूर्वी स्वतःच्या हस्ताक्षरात थोडक्यात लिहून ठेवणं आणि उद्याच्या दिवसाचं साधारण नियोजन करणं बस! शुभस्य शीघ्रम!

लक्षपूर्वक ऐकणं आणि समजून घेणं हा सुद्धा संवाद कौशल्याचाच अपरिहार्य भाग म्हणावा लागेल. नेमकी शब्दयोजना करणं आणि नेमका अर्थ व्यक्त करणं म्हणजे भाषिक कौशल्य! कोणत्याही क्षेत्रात जा आणि तिथल्या अनुभवांवर तुमच्या मातृभाषेत पुस्तक नक्की लिहा. फक्त कृत्रिम बुद्धिमत्तेला ते काम सांगू नका.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.