पुणे - कर्वे रस्त्यावरील मेट्रो स्टेशनजवळ उड्डाणपुलावर मध्यरात्री पुलाच्या कठड्याला धडकून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. राजसिंग टमाट्टा (वय २५, रा. कम्युनिटी कॅफे, कोथरूड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी विनोद पिल्ले (वय-५५, रा. घोरपडी गाव) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जुलै रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास राजसिंग टमाट्टा हा दुचाकीवरून कर्वे रस्त्यावरील उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जात होता.
एसएनडीटी मेट्रो स्थानकाजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट उड्डाणपुलाच्या कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच अलंकार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी राजसिंगला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.