विदर्भाला पावसानं झोडपून काढलं आहे, पावसामुळे नागपूर जिल्ह्यात मोठं नुकसान झालं, अनेकांच्या घरात पाणी शिरल्याचं देखील पाहायला मिळालं. दरम्यान दुसरीकडे अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पुराचा धोका वाढल्यानं चंद्रपूर जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
उद्या शाळेला सुट्टी
चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे, मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकीकडे मुसळधार पावसामुळे आधीच नद्यांना पूर आला आहे, त्यातच आता दुसरीकडे गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उद्या जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि कॉलेज यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुट्टी देण्यात आली आहे.
गडचिरोलीलाही पावसानं झोडपलं
दरम्यान दुसरीकडे गडचिरोलीलाही पावसानं चांगलंच झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुसरा राष्ट्रीय महामार्गही बंद झाला आहे. त्यामुळे जवळपास सहा तालुक्यांचा गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. चामोर्शी,अहेरी, भामरागड मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा या सहा तालुक्याच्या संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला आहे. चामोर्शी- आष्टी राष्ट्रीय महामार्गावर शिवनी गावाजवळ वैनगंगा नदीला पूर आल्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे.
अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस
अमरावती जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नागपूर -छत्रपती संभाजीनगर एक्स्प्रेस वे वर पाणी साचलं आहे. दुसरीकडे धामणगाव तालुक्यातील देवगाव- बोरगाव जवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक बंद केली. वाहतूक बंद झाल्यामुळे महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच आवाहन करण्यात आलं आहे, तसेच आवशकता असेल तरच घराबाहेर पडा असंही स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.