Maharashtra Political Live Updates : मोठी बातमी: मनोज जरांगेंचा मंत्री शिरसाटांवर आरोप; म्हणाले, ...अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय!
Sarkarnama July 10, 2025 07:45 AM
मोठी बातमी: मनोज जरांगेंचा मंत्री शिरसाटांवर आरोप; म्हणाले, ...अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय!

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जर आमची कागदपत्रं अडवली, तर आम्ही शासकीय कार्यालयाला घेराव घालणार आहोत, मराठ्यांच्या मुलांचं नुकसान होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाहीत, आमच्या लेकरांचं वाटोळ होत असेल तर आम्हालाही कळतं सरकारला कसं नीट करायचं, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून कुणबी सर्टिफिकेट देऊ नयेत यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही जरांगेंनी केला आहे.

किरीट सोमय्यांनी टार्गेट बदललं, भ्रष्टाचारानंतर आता मुंबईतील वृक्षतोडीचा मुद्दा तापवणार

भाजप नेते किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचारानंतर मुंबईतील वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित केला आहे. घाटकोपरजवळील खंडोबा टेकडीच्या जंगलात बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर आणि महापालिकेतील एल वॉर्डमधील अधिकारी या तिघांनी मिळून जंगलाचा सत्यानाश केल्याचा आरोप केला आहे.  

मोठी बातमी: महाराष्ट्राला जोरदार पावसाचा तडाखा, हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना 'हाय अलर्ट'

महाराष्ट्राला सध्या जोरदार पावसाचा तडाखा बसतो आहे. भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील विविध जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत नाशिक घाट, पुणे घाट, रायगड आणि चंद्रपूर,अमरावती, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे .

मुंबईतील आझाद मैदानावर गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी (ता.9) विविध मागण्या आणि हक्काच्या घरासाठी आंदोलन केले. या आंदोलनात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्यांनी मुंबई उभी केली, त्या गिरणी कामगारांना तुम्ही मुंबईबाहेर जागा देणार का? असा सवाल उपस्थित केला. सर्व गिरणी कामगारांना धारावीतच जागा देण्याची मागणी ठाकरेंनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.