US 50% Tariffs on Brazil: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलकडून आपला बदला घेतला आहे. ट्रम्प यांनी बुधवारी जागतिक व्यापार आघाडीवर आक्रमक भूमिका घेत प्रथम ७ देशांवर आयात शुल्क लादले. त्यानंतर त्यांनी ब्राझीलवरही टॅरिफ बॉम्ब टाकत ५० टक्के आयात शुल्क लावले. त्यापूर्वी त्यांनी अल्जेरिया, इराक, लिबिया, श्रीलंका (३०%), ब्रुनेई, मोल्दोव्हा (२५%) आणि फिलीपिन्स (२०%) साठी शुल्क जाहीर केले होते. हे शुल्क १ ऑगस्टपासून लागू होतील.
ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतर काही तासांतच ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी अमेरिकेवर प्रत्युत्तर कर लावण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, अमेरिकेने ब्राझीलवरील आयात शुल्क एकतर्फी वाढवले तर ब्राझील देखील प्रत्युत्तरात्मक कारवाई करेल. दरम्यान, ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष लूला यांना एक पत्रही लिहिले आहे. यात म्हटले आहे की, ते ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना ओळखतात आणि त्यांचा आदर करतात. बोल्सोनारो यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटला राजकीय षड्यंत्र आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलमधून येणाऱ्या उत्पादनांवर ५० टक्के मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावण्याची घोषणा केली. ब्राझीलमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. बोल्सोनारो सध्या सत्तापालटाचा कट रचल्याच्या आरोपाखाली खटल्याला सामोरे जात आहेत.
अध्यक्ष लूला यांच्या कार्यालयाने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक परस्पर व्यवहार कायद्याअंतर्गत कोणत्याही देशाने एकतर्फी कर वाढ केल्यास ब्राझील प्रतिसाद देईल. या विधानामुळे अमेरिका आणि चीननंतर आता अमेरिका आणि ब्राझीलमधील व्यापार युद्धाची भीती होणार आहे. तसेच ट्रम्पच्या घोषणेनंतर लुला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली. त्यात म्हटले की, ब्राझील एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे. ज्याच्या स्वतःच्या स्वतंत्र संस्था आहेत. इतर कोणत्याही देशाचा हस्तक्षेप स्वीकारणार नाही.