जगभरात बालविवाह एक मोठी समस्या ठरली आहे. अनेक देशांमध्ये बालविवाह रोखण्यासाठी कायदे तयार केले गेले आहे. परंतु शरियत कायद्यानुसार सरकार चालवणाऱ्या तालिबानच्या अफगाणिस्तानमध्ये बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी ४५ वर्षांच्या व्यक्तीने तिसरे लग्न केले आहे. त्याच्या वधूचे वय केवळ सहा वर्ष आहे. अमेरिकेतील अफगान मीडिया Amu.tv ने याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, तालिबान सरकार या बातमीनंतर घाबरले. त्यांनी मुलीच्या वडिलांना अटक केली. तसेच ४५ वर्षीय पतीला त्याच्या पत्नीला घरी घेऊन जाण्यापासून रोखले. सहा वर्षांची मुलगी जेव्हा ९ वर्षांची होईल, तेव्हा तिला त्याला घेऊन जाता येईल, असे तालिबान सरकारने म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील हेलमंद राज्यातील या प्रकारानंतर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
तालिबान राजवटीमध्ये महिलांची परिस्थिती बिकट आहे. अफगाणिस्तानमधील हेलमंद राज्यात ४५ वर्षाच्या व्यक्तीने ६ वर्षांच्या मुलीसोबत लग्न केले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यानंतर तालिबान सरकार कठोर कारवाई करणार? अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु तालिबान सरकारने जो निर्णय घेतला, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
मरजाह जिल्ह्यातील या लग्नासाठी अनेकांना आमंत्रण दिले होते. वधू पिता मुलीच्या लग्नामुळे आनंदात होता. परंतु या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर वधू पित्यास अटक करण्यात आली. मात्र, त्याच्यावर कोणताही आरोप ठेवण्यात आला नाही. ज्या व्यक्तीसोबत सहा वर्षांच्या मुलीचे लग्न झाले त्याचे यापूर्वी तीन लग्न झाले आहेत. मुलीच्या परिवाराने त्या व्यक्तीकडून ‘वलवार’(लग्नासाठी पैसे घेणे) घेतले.
तालिबान सरकारने या लग्नासंदर्भात आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. मुलगी जोपर्यंत ९ वर्षांची होत नाही तोपर्यंत तिला आई-वडिलांच्या घरीच ठेवण्यात येणार आहे. म्हणजेच तीन वर्षानंतर तिचा पती तिला घेऊन जाणार आहे.
अफगाणिस्तानमध्ये २०२१ मध्ये तालिबान सत्तेत आले. त्यानंतर अफगाणिस्तानमधील बाल विवाह आणि सक्तीच्या विवाहांच्या प्रकारात वाढ झाली आहे. तालिबान सरकारने महिलांवर लावण्यात आलेले निर्बंध आणखी वाढवले आहेत. यूनिसेफच्या माहितीनुसार, जगभरात सर्वाधिक बालविवाह अफगाणिस्तानमध्ये होत आहेत.