राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं, पहिलीपासून हिंदी नको अशी भूमिका अनेक पक्ष आणि संघटनांची होती. याविरोधात मनसेनं मोठं आंदोलन उभारलं, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं देखील या आंदोलनात उडी घेतली. अखेर राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राबाबत काढण्यात आलेले दोन्ही जीआर मागे घेतले, त्यानंतर पाच जुलै रोजी मुंबईमध्ये विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली.
दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून 8 जुलै रोजी मिरा-भाईंदरमध्ये मनसेनं देखील मोर्चा काढला होता. या मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येनं लोक मनसेच्या या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर आता 18 जुलै रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे हे मिरा रोडा येथे सभा घेणार आहेत. मनसेच्या आंदोलनानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे मीरा रोडमध्ये सभा घेणार आहेत. मनसेची ही आभार सभा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणारं? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या एका मिठाई विक्रेत्यास मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती, त्यानंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी मिरा -भाईंदर येथे अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. मात्र हा मोर्चा भाजप पुरस्कृत असून मराठी माणसांना डिवचण्यासाठी काढण्याचा आल्याचा आरोप मनसेच्या वतीनं करण्यात आला होता.
त्यानंतर मनसेनं देखील आठ मार्च रोजी मिरा-भाईंदर येथे भव्य मोर्चा काढला, या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येनं लोक या मोर्चात सहभागी झाले होते. त्यानंतर आता राज ठाकरे हे येत्या आठरा मार्चला सभा घेणार आहेत. राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहाणं महत्त्वाचं असणार आहे.