इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 10 जुलैपासून लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येत आहे.मात्र सामन्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याला दुखापत झाली आहे. त्यामुळे पंतला मैदानाबाहेर जावं लागलं आहे. पंतला बाहेर जावं लागल्याने टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. तसेच पंत बाहेर गेल्याने आता ध्रुव जुरेल विकेटकीपिंग करत आहे.
टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा टॉस गमावल्यानंतर फिल्डिंगसाठी यावं लागलं. भारताने पहिल्याच सत्रात इंग्लंडला 2 झटके दिले. नितीश कुमार रेड्डी याने त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स मिळवल्या. ऋषभ पंत याने स्टंपमागून दोन्ही फलंदाजांच्या कॅचेस घेतल्या. मात्र पंतला दुसऱ्या सत्रात मैदानात फार वेळ घालवता आला नाही. पंतला दुखापत झाल्याने मैदानाबाहेरचा रस्ता धरावा लागला.
पंतला दुसर्या सत्रात दुखापत झाली. जसप्रीत बुमराह सामन्यातील 34 वी ओव्हर टाकत होता. बुमराहने लेग स्टंपबाहेर बॉल टाकला. पंतने हा बॉल अडवण्यासाठी डाईव्ह मारली. मात्र पंत बॉल रोखण्यात अपयशी ठरल्याने फोर गेला. मात्र चाहत्यांचं लक्ष हे या फोरऐवजी पंतकडे गेलं. पंतला डाईव्ह मारणं महागात पडलं. पंतच्या डाव्या हाताचं बोट मुरडलं. त्यामुळे पंतला वेदना झाल्या.
पंतला वेदना होत असताना पाहून टीम इंडियाचं वैद्यकीय पथक मैदानात आलं. मेडीकल टीमने पंतच्या हातावर मॅजिक स्प्रे मारला. मात्र पंतला यानंतर हातात ग्लोव्होज घालताना त्रास जाणवू लागला. मात्र पंतने कसंतरी या ओव्हरमधील उर्वरित 5 चेंडूपर्यंत विकेटकीपिंग केली. पंतने त्यानंतर मैदनाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे पंतच्या जागी ध्रुव जुरेलला संधी देण्यात आली.
पंत ड्रेसिंग रुममध्ये पोहचताच टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर त्याच्या जवळ गेला. गंभीरने पंतची चौकशी केली. दरम्यान पंतला झालेली दुखापत किती गंभीर आहे? पंतला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागणार का? असे प्रश्न आता क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
पंतला दुखापत, टीम इंडियाला टेन्शन
“पंतवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. पंतवर आवश्यक उपचार केले जात आहेत”, अशी माहिती बीसीसीआयने पंतच्या दुखापतीबाबत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.